कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
By Admin | Updated: January 16, 2017 01:03 IST2017-01-16T01:03:34+5:302017-01-16T01:03:34+5:30
राष्ट्रीय शालेय स्पर्धा : हरियाणा, पंजाब उपविजेते; सोनाली हेळवी, बबलू गिरीची अष्टपैलू खेळी

कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी मुकुट
शिरोळ : अत्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेत मुले व मुली या दोन्ही महाराष्ट्र संघांनी दुहेरी मुकुट पटकाविला. यामध्ये मुली विभागात महाराष्ट्र विरुध्द हरियाणा यांच्यात झालेल्या लढतीमध्ये महाराष्ट्र संघ विजेता ठरला. तर मुलांत झालेल्या महाराष्ट्र विरुध्द पंजाब या लढतीत महाराष्ट्र संघ विजयी ठरला. विजयी संघ सहकारमहर्षी डॉ. सा. रे. पाटील चषकाचे मानकरी ठरले.
शिरोळ येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबासाहेब लडगे क्रीडानगरी येथे सलग चार दिवस सुरू झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचा रविवारी अंतिम दिवस होता. मुली विभागात झालेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र विरुध्द हरियाणा यांच्यातील लढत लक्ष्यवेधी ठरली. क्षणाक्षणाला उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात महाराष्ट्र संघाने हरियाणाला पराभूत करून ३ गुणांनी हा सामना जिंकत अजिंक्यपद पटकावले. महाराष्ट्राच्या सोनाली हेळवी हिने अष्टपैलू खेळी केली. तर मुले विभागात महाराष्ट्र विरुध्द पंजाब असा अंतिम सामना झाला. बबलू गिरी याच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राने २२ विरुध्द ९ असा सामना जिंकून विजेतेपद पटकावले.
तत्पूर्वी रविवारी उपांत्य फेरीच्या सामन्याला प्रारंभ झाला. मुले विभागात महाराष्ट्राने हरियाणाला केवळ एका गुणाने पराभूत केले. दुसरा सामना पंजाब विरुध्द केरळ असा झाला. या सामन्यात पंजाब विजेता ठरला. मुलींच्या विभागात हिमाचल प्रदेश विरुध्द महाराष्ट्र सामन्यात महाराष्टाने ४ गुणांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
दुसरा सामना दिल्ली विरुध्द हरियाणा असा होऊन यामध्ये हरियाणाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुले विभागात हरियाणाने केरळाला पराभूत केले तर मुलींच्या विभागात हिमाचलने दिल्लीला पराभूत केले.
यावेळी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील,इंडियन डेअरी असोशिएशनचे अध्यक्ष अरुण नरके, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार उल्हास पाटील, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सहसंचालक नरेंद्र सोपल, स्पर्धा निरीक्षक जे. सी. शर्मा व मूर्ति (मध्यप्रदेश), तांत्रिक निरीक्षक दलवीर सिंग (दिल्ली), पंच प्रमुख अजित पाटील, स्पर्धा संयोजक अमरसिंह पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, डॉ. जे. जे. मगदूम ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज मगदूम, नगरसेविका अॅड. सोनाली मगदूम, प्रा. संभाजी पाटील, प्रा. आण्णासाहेब गावडे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, रावसाहेब देसाई, अशोकराव माने, एम. व्ही. पाटील, प्रमोद लडगे, राष्ट्रीय खेळाडू नितीन मदने उपस्थित होते.
(प्रतिनिधी)