सव्वाशे वस्तीशाळांचे शिक्षक नियमित

By Admin | Updated: July 21, 2014 00:39 IST2014-07-21T00:36:58+5:302014-07-21T00:39:41+5:30

जिल्हाध्यक्ष नामदेव रेपे व सरचिटणीस बी. एस. पाटील

Twenty-three Vastishala Teachers Regular | सव्वाशे वस्तीशाळांचे शिक्षक नियमित

सव्वाशे वस्तीशाळांचे शिक्षक नियमित

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२५ वस्तीशाळा शिक्षक, महिला शिक्षण सेवकांची पडताळणी मार्गी लावून त्यांना सेवेत नियमित करण्यात प्राथमिक शिक्षक संघाला यश आल्याची माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेव रेपे व सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील १२२ प्राथमिक शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी, निवडश्रेणीचा प्रश्न प्रामुख्याने मार्गी लागला आहे.
अनेक वर्षे प्राथमिक शिक्षकांचा वरिष्ठ वेतनश्रेणी, वस्तीशाळा शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न, महिला शिक्षण सेविकांचा प्रश्न प्रलंबित होता. या प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने प्रयत्न सुरू केले होते. प्राथमिक शिक्षकांना बारा व चोवीस वर्षांनंतर मिळणाऱ्या वेतनश्रेणीसाठी जिल्ह्यातून १२२ प्रस्ताव प्रलंबित होते. यामध्ये आजरा तालुक्यातील ९, शिरोळ १, राधानगरी २२, भुदरगड १२, हातकणंगले ३१, चंदगड २४, कागल १, शाहूवाडी व पन्हाळा प्रत्येकी १०, गगनबावडा २ असे प्रस्ताव होते. महिला समांतर आरक्षणातून नेमणूक झालेल्या जिल्ह्यातील ६३ महिला शिक्षण सेविकांचा प्रश्न पुणे येथून पडताळणी झाली नसल्याने प्रलंबित होता. ही पडताळणी पूर्ण करताना या ६३ महिला शिक्षण सेविकांना सेवेत कायम करण्यात यश आले.
जिल्ह्यातील १२५ वस्तीशाळा शिक्षकांना सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्याला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने यश आले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या दृष्टीने हे तिन्ही प्रश्न महत्त्वपूर्ण होते, ते मार्गी लावण्याचे काम शिक्षक संघाच्या माध्यमातून करू शकलो, असे नामदेव रेपे यांनी सांगितले. यासाठी महिला व बालकल्याण आयुक्त राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उमेश आपटे, शिक्षण सभापती महेश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सूर्यवंशी, शिक्षणाधिकारी स्मिता गौड यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभल्याचे रेपे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Twenty-three Vastishala Teachers Regular

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.