पंचवीस जणांची कसून चौकशी !

By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:32:59+5:302015-07-22T00:34:25+5:30

कऱ्हाडातील टोळीयुद्ध : संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Twenty-five people thorough investigation! | पंचवीस जणांची कसून चौकशी !

पंचवीस जणांची कसून चौकशी !

कऱ्हाड : टोळीयुद्धातून झालेल्या बबलू माने व बाबर खानच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. पोलिसांनी सुमारे २५ जणांकडे कसून चौकशी केली असून, त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांची वेगवेगळी पथके तयार करून सर्व शक्यता गृहीत धरून पोलीस तपास सुरू आहे.
दरम्यान, कऱ्हाड हे संघटित गुन्हेगारीचे केंद्र बनत असल्याचे सोमवारच्या घटनेतून स्पष्ट होत असून, संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करणार असल्याचे व त्याद्वारे गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शहरातील मंडईमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास टोळीयुद्धाचा भडका उडाला. सल्या चेप्या गोळीबार प्रकरणात हात असणाऱ्या बबलू माने याच्यावर बाबर खानने गोळ्या झाडल्या. बबलू माने हा त्याच्या घरापासून काही अंतरावर वर्तमानपत्र वाचत बसला असताना बाबर खान त्याठिकाणी आला. त्याने त्याच्याजवळील पिस्तुलातून बबलूला गोळ्या घातल्या. त्यानंतर त्याठिकाणी आलेली बबलूची आई अनुसया यांच्यावरही त्याने गोळ्या झाडल्या. या गोळीबारात बबलूचा मृत्यू झाला तर त्याची आई गंभीर जखमी झाली. घटनेनंतर जमावाने बाबर खानला दगडाने ठेचून ठार मारले. या भयानक घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. मंगळवारी दिवसभर शहरात तणावपूर्ण शांतता होती.
याप्रकरणी कऱ्हाड उपविभागातील पोलीस अधिकारी या घटनेच्या तपासाभोवती आहेत. तसेच सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला आहे. सोमवारपासून पोलिसांनी दोन्ही गटातील अनेकांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे २५ जणांची कसून चौकशी झाली. त्यातून काही महत्त्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांची वेगवेगळी पथके तपासासाठी सांगली व कोल्हापूरला पाठविण्यात आली आहेत. दरम्यान, कऱ्हाडात अद्याप कडक पोलीस बंदोबस्त आहे. (प्रतिनिधी)
बाबरने सहा
गोळ्या झाडल्या
बबलू ज्याठिकाणी बसला होता, त्याठिकाणी पोहोचल्यानंतर बाबर खानने दोन गोळ्या बबलूवर झाडल्या. त्यानंतर प्रतिकार करणाऱ्या अनुसया माने यांच्यावरही बाबरने दोन गोळ्या झाडल्या. तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दहशत माजविण्यासाठी आणखी दोन गोळ्या झाडल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
पिस्तुल ९ एम.एम.चे
बाबरने गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल पोलिसांनी सोमवारीच घटनास्थळावरून हस्तगत केले आहे. संबंधित पिस्तुल ९ एम. एम.चे आहे. मात्र, ते परदेशी बनावटीचे आहे की नाही, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. पिस्तुल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर ती माहिती कळू शकेल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.

Web Title: Twenty-five people thorough investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.