खर्चीवाल्यांची वीस कोटींची पिळवणूक

By Admin | Updated: March 18, 2016 00:57 IST2016-03-18T00:56:14+5:302016-03-18T00:57:09+5:30

रत्येक तीन वर्षांनी वाढलेल्या कामगार वेतन, वाढीव वीज दर, महागाई अशा प्रमाणात मजुरीवाढ दिली जाते. सन २०१३ मध्ये ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर साडेपाच पैसे मजुरी ठरली होती.

Twenty crores of expenditure of the expenditure | खर्चीवाल्यांची वीस कोटींची पिळवणूक

खर्चीवाल्यांची वीस कोटींची पिळवणूक

राजाराम पाटील-- इचलकरंजी  -वस्त्रोद्योगात असलेल्या आर्थिक मंदीच्या गोंडस नावाखाली बड्या कापड उत्पादक-व्यापाऱ्यांकडून खर्चीवाले (जॉब वर्क) यंत्रमागधारकांची महिन्याला वीस कोटी रुपयांची पिळवणूक केली जात आहे. वीज दर कामगारांची मजुरी आणि महागाईने पिचलेल्या या यंत्रमागधारकांचे कंबरडे मोडले असून, हजारो यंत्रमागधारकांनी आंदोलन सुरू केले आहे. या अस्वस्थतेचे अशांत आंदोलनात रूपांतर होण्यापूर्वी प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष घालून याप्रकरणी सन्माननीय तोडगा काढावा, अशी जाणकारांची मागणी आहे.येथील काही बडे कापड व्यापारी व कापड उत्पादकांकडून शहर व परिसरातील सुमारे चाळीस हजारांहून अधिक यंत्रमागांवर जॉब वर्क पद्धतीने कापड उत्पादन करून घेतले जाते. इचलकरंजीतून बेळगाव, सांगली, सातारा जिल्ह्यांतील काही यंत्रमाग कारखान्यांना सूत बिमे देऊन कापड विणून घेतले जाते. त्यापैकी खर्चीवाले (जॉब वर्क) यंत्रमागधारकांना प्रत्येक तीन वर्षांनी वाढलेल्या कामगार वेतन, वाढीव वीज दर, महागाई अशा प्रमाणात मजुरीवाढ दिली जाते. सन २०१३ मध्ये ५२ पिकाच्या कापडास प्रतिमीटर साडेपाच पैसे मजुरी ठरली होती. त्याला तीन वर्षे उलटून गेल्यानंतर या मजुरीमध्ये जानेवारी २०१६ पासून वाढ व्हावी, अशा आशयाची मागणी करणारे निवेदन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने कापड व्यापाऱ्यांच्या इचलकरंजी क्लॉथ अँड यार्न मर्चंटस् असोसिएशन संघटनेला दिले होते.
खर्चीवाले यंत्रमागधारकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून याप्रकरणी त्यांनी मध्यस्थी करावी, अशा आशयाची मागणी केली. त्याप्रमाणे प्रांताधिकाऱ्यांकडे तीन संयुक्त बैठका झाल्या; पण कापड व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी,आर्थिक मंदी असल्याने आपल्याला मजुरीमध्ये वाढ करून देता येणार नाही, हेच पालुपद चालू ठेवले. मात्र, त्यांच्याकडे आग्रह होताच प्रत्येक यंत्रमाग कारखान्याच्या स्तरावर व्यापाऱ्यांनी चर्चा करून मजुरी ठरवावी, अशीही पळवाट व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींनी शोधली.
जॉबर, कांडीवाला, वहिफणी अशा कामगारांच्या वेतनामध्येसुद्धा वाढ झाली आहे, तर यंत्रमागासाठी लागणारे सुटे भाग आणि अन्य प्रकारच्या महागाईत दीडपट ते दुपटीने वाढ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये खर्चीवाले यंत्रमागधारकांना चार रुपये ६८ पैसे प्रतिमीटर मजुरी मिळावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने करण्यात आली आहे. तरीसुद्धा मजुरीत वाढ झाली नसल्याने महागाईने कंबरडे मोडलेल्या यंत्रमागधारकांची आणखीन पिळवणूक चालू आहे.


मजुरीवाढ दिली पाहिजे : आवाडे
खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ मिळावी, या मागणीसाठी गुरूवारी शहरातील जनता चौकामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शनाचे नेतृत्व इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केले. यावेळी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी, इचलकरंजीचा विकास कामगार, यंत्रमागधारक, व्यापारी-व्यावसायिक यांच्यामुळेच झाला आहे, असे सांगितले. ते म्हणाले, सध्याच्या वाढलेल्या महागाईचा, कामगारांच्या मजुरीचा, वीज दराचा विचार करून कापड व्यापाऱ्यांनी खर्चीवाले यंत्रमागधारकांना मजुरीवाढ दिली पाहिजे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता मजुरीवाढीचा प्रश्न सोडवावा, असेही आवाहन त्यांनी केले. याचवेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी, प्रांताधिकारी कार्यालयात शनिवारी (दि.१९) होणाऱ्या संयुक्त बैठकीत तोडगा न निघाल्यास सोमवारी (दि.२१) व्यापारी असोसिएशनच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.

Web Title: Twenty crores of expenditure of the expenditure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.