बारा दिवसांत पाऊण लाख नागरिकांचे पोट भरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST2021-04-30T04:30:36+5:302021-04-30T04:30:36+5:30
कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ ...

बारा दिवसांत पाऊण लाख नागरिकांचे पोट भरले
कोल्हापूर : संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे गरिबांना उपाशीपोटी राहावे लागू नये यासाठी मोफत सुरू झालेल्या शिवभोजनाचा गेल्या १२ दिवसांत ७४ हजार २६२ नागरिकांनी लाभ घेतला आहे. थाळ्यांची संख्या वाढविलेल्या दिवसापासूनची ही आकडेवारी असून, दिवसाला सरासरी पाच हजार ७०० पर्यंत थाळ्यांचे वितरण होत आहे. राज्य शासनाच्या या उपक्रमाचा गोरगरिबांना अत्यंत चांगला उपयोग होत असून, त्यांची उपासमार टळली आहे.
एप्रिल महिन्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने राज्य शासनाने १४ तारखेला संचारबंदी लागू केली, त्याच दिवशी गरिबांसाठी शिवभोजन थाळी मोफत देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र थाळ्यांची संख्या कमी पडू लागल्याने शासनाने १६ तारखेला अध्यादेश काढून १७ तारखेपासून केंद्रांवरील वितरणाच्या दीडपट थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली. वेळेतदेखील एक तासाने वाढ करून चार वाजेपर्यंत करण्यात आली. ज्या केंद्रांना २०० थाळ्यांची मान्यता होती ती वाढून ३०० इतकी झाली. पूर्वी जिल्ह्याला दिवसाला ४ हजार थाळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते वाढून सहा६ हजार करण्यात आले.
थाळ्यांची संख्या वाढवण्यात आली असली तरी लाभार्थ्यांअभावी रोज सहा हजारांऐवजी पाच हजार ६०० ते ५ हजार ८०० इतक्या थाळ्यांचे वितरण होत आहे. गेल्या १२ दिवसांत जिल्ह्यातील सर्व ३७ केंद्रांवरून ७४ हजारांहून अधिक नागरिकांनी या शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे.
---
तालुकानिहाय केंद्रांची संख्या
कोल्हापूर शहर : ९
हातकणंगले : ५
राधानगरी : ३
शिरोळ : ३
गडहिंग्लज : ३
पन्हाळा : ३
शाहूवाडी : २
गगनबावडा : २
कागल : २
चंदगड : २
आजरा : १
करवीर : १
भुदरगड : १
एकूण केंद्रसंख्या : ३७
रोज होणारे वितरण : ५ हजार ७०० ते ८००
--
मोबाईल आणि शिवभोजन...
मोबाईल क्रमांक नसेल तर शिवभोजन देऊच नये असे सरकारचे आदेश नाहीत; परंतु या व्यवहारात पारदर्शकता राहावी व शासनाने दिलेले जेवण गोरगरीब जनतेच्या मुखातच जावे यासाठी केंद्रचालकांना मोबाईल क्रमांकाच्या बाबतीत सक्त सूचना दिल्या असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी सांगितले. त्याबाबत ‘लोकमत’कडे लोकांकडून तक्रार आली होती. गोरगरिबांकडे मोबाईल नसतो; मग त्यांना जेवण मिळणार नाही का? अशी विचारणा करण्यात आली होती.