इचलकरंजीतील प्रमुख रस्त्यांसाठी बारा कोटी

By Admin | Updated: April 17, 2015 00:08 IST2015-04-16T00:26:02+5:302015-04-17T00:08:44+5:30

सुरेश हाळवणकर : फुटपाथ, पथदिव्यांसह रस्ते करणार; रामलिंग, धुळोबासाठी विकास आराखडा तयार

Twelve crores for the main roads of Ichalkaranji | इचलकरंजीतील प्रमुख रस्त्यांसाठी बारा कोटी

इचलकरंजीतील प्रमुख रस्त्यांसाठी बारा कोटी

इचलकरंजी : शहरातील बाह्यवळण मार्गांसह प्रमुख रस्ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात येणार असून, त्यासाठी बारा कोटी रुपयांचे अनुदान शासनाने देण्याची मंजुरी दर्शविली आहे. तसेच शासनाच्या अनुदानातून शहरातील सर्व नळांना मीटर बसविण्यात येतील, अशी माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इचलकरंजी शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी शासनाने बारा कोटी रुपयांचे विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. हे रस्ते दुभाजक फुटपाथांसह पथदिव्यांनी सुशोभित केले जातील, असे सांगून आमदार हाळवणकर म्हणाले, या रस्त्यांसाठी संबंधित मक्तेदाराकडून पाच वर्षांची हमी घेतली जाईल. नगरपालिकेकडील आयजीएम दवाखान्यासाठी ३० कोटी रुपयांची यंत्रसामग्री देण्याची तयारी शासनाची आहे; पण त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व तंत्रज्ञ मिळत नाहीत. म्हणून ‘पब्लिक-प्रायव्हेट प्रॉपर्टी’ तत्त्वाने दवाखाना पूर्णपणे चालू केला जाईल. त्यामुळे केसरी, पिवळ्या व अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मोफत उपचार मिळतील. यंत्रमाग व्यवसाय कृषिपूरक उद्योग असल्याने त्याला स्वतंत्र वर्गवारीचा दर्जा दिला जाईल.
यंत्रमाग उद्योगासाठी सवलतीचा वीज दर मिळावा, यासाठी शासनाने १२३२ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे वीज दर दोन रुपये ५० पैसे प्रति युनिट राहण्याची शक्यता आहे. कृष्णा नळपाणी योजनेची अशुद्ध पाण्याची दाबनलिका अंशत: बदलण्यासाठी
३० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला गती मिळाली आहे.
रामलिंग व धुळोबा येथे वनपर्यटन व वनउद्यान अशी २०० एकर जागा विकसित करण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून, तेथे वन खात्याकडून निधी उपलब्ध करून विकास केला जाणार आहे. कबनूर हद्दीमध्ये नवीन पोलीस ठाणे, रेल्वे मार्गावर अतिग्रे व हातकणंगले येथे उडान पूल बांधण्यासाठी सरकारकडून निधी देण्यात येईल. (प्रतिनिधी)

चिंचवाड-रुकडीच्या भू-संपादनासाठी ३.५ कोटी
नवे चिंचवाड ते रुकडी दरम्यानच्या रस्त्याचे भू-संपादन करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये शासनाने मंजूर केले असून, पंचगंगा नदीवरील पूल थेट या रस्त्याने जोडला जाईल. त्याचप्रमाणे या मार्गाचे रुंदीकरण व विकास जिल्हा मार्ग म्हणून केला जाईल. तसेच इचलकरंजी मतदारसंघातील अन्य गावांनाही जोडणारे रस्ते विकसित केले जाणार असून, त्यासाठी १२.५५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.


यंत्रमाग कामगार मंडळ महिन्यात
सुतावर प्रतिकिलो एक रुपया सेस आकारून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. त्याला येत्या महिन्याभरात अंतिम मान्यता मिळेल. तसेच यंत्रमाग कामगार किमान वेतनाची पुनर्रचना २८ वर्षानंतर झाली असून, त्याची अधिसूचना २९ जानेवारीला जाहीर झाली आहे. त्यामुळे आता या क्षेत्रातील कामगारांना ८५०० ते ९५०० रुपये दरमहा वेतन मिळेल, अशीही माहिती आमदार हाळवणकर यांनी दिली.

Web Title: Twelve crores for the main roads of Ichalkaranji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.