साखर कामगारांना बारा टक्के पगारवाढीचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:31+5:302021-09-10T04:30:31+5:30
एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी साखर कामगारांना बाप्पा पावला यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन ...

साखर कामगारांना बारा टक्के पगारवाढीचा निर्णय
एप्रिल २०१९ पासून अंमलबजावणी
साखर कामगारांना बाप्पा पावला
यड्राव: राज्यातील साखर कामगारांना बारा टक्के वेतनवाढीसह विविध भत्त्यांमध्ये वाढ देऊन त्याची अंमलबजावणी एप्रिल २०१९ पासून करण्याचा निर्णय त्रिपक्षीय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. समितीचे अध्यक्ष व साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घोषणा करण्यात आली. साखर संकुल पुणे येथे बैठक पार पडली. या अंतरिम पगारवाढ ऐवजी थेट पगारवाढीच्या निर्णयामुळे राज्यातील दीड लाख साखर कामगारांना गणपती बाप्पा पावला आहे.
मार्च २०१९ च्या मूळ पगार, महागाई भत्त्यासह स्थिर भत्त्यावर १२ टक्के वेतनवाढ, व इतर भत्त्यांवर १२ टक्केप्रमाणे वाढ देण्यात आली आहे, महागाई भत्ता निर्देशांक २.७० वरून २.९० करण्यात आला आहे. सहा वर्षं सेवा झालेल्यांना एक वार्षिक वेतनवाढ तर १३ वर्षाला दोन व २० वर्षे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना तीन वार्षिक वेतन वाढ मिळणार आहेत. अकुशल कामगारांना २,४५० ते सुपरवायझरी कामगारांना २,७५० पर्यंत वाढ मिळणार आहे.
राज्यातील साखर कामगारांचा वेतन करार ३१ मार्च २०१९ रोजी संपला होता. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळासह विविध कामगार संघटनांच्या आंदोलनाचा पवित्र्यामुळे शासनाला त्रिपक्षीय समिती नेमली. दरम्यानच्या काळात कोरोनाचे संकट व संचारबंदीमुळे निर्णय प्रक्रियेला विलंब लागला. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समन्वय साधून तोडगा काढल्याने साखर कामगारांच्या पगारवाढीचा मार्ग मोकळा झाला.
या बैठकीस साखर आयुक्त शेखर गायकवाड, कामगार उपायुक्त रविराज इळवे, हर्षवर्धन पाटील, प्रकाश आवाडे, चंद्रदीप नरके, तात्यासो काळे, शंकरराव भोसले, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, प्रदीप बणगे, संजय मोरबाळे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.
थेट पगार वाढ
साखर कामगारांचे वेतन करार संपल्यावर त्रिपक्षीय समिती अंतरिम वाढ देऊन नंतर पगारवाढीचा निर्णय घेत होती. परंतु यावेळी अंतरिम पगारवाढीऐवजी थेट पगार वाढ होत असल्याने चांगली पगारवाढ झाली आहे. लेट असेना पण थेट पगारवाढ व्हावी यासाठी आमचा आग्रह होता तो पूर्ण झाला. राऊसाहेब पाटील सदस्य त्रिपक्षीय समिती सदस्य.
शरद पवारांचाच निर्णय
साखर कामगारांच्या वेतनवाढी प्रश्नी १९९८ ते २००२ शरद पवार निवडा, त्यानंतर एप्रिल २००५ ते मार्च २००९, एप्रिल २००९ ते मार्च २०१४, एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या चार वेतनवाढीचे निर्णय शरद पवारांच्या तोडग्यामुळेच साखर कामगारांना पगार वाढ झाली आणि यावेळी ऑगस्ट महिन्यात साखर कारखानदार व कामगार प्रतिनिधीच्या बैठकीत शरद पवार यांनी तोडगा काढल्याने हा पगारवाढीचा निर्णयावर शिक्कामोर्तब झाला.