निकालाच्या सुत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:16 IST2021-07-19T04:16:27+5:302021-07-19T04:16:27+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ...

निकालाच्या सुत्राने उडवली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढवली चिंता!
कोल्हापूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाने यावर्षी बारावीची परीक्षा रद्द केली. दहावीतील ३० टक्के, अकरावीतील ३० टक्के आणि बारावीतील ४० टक्के अंतर्गत गुणांच्या आधारे सरासरी काढण्याच्या सुत्राव्दारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून निकाल जाहीर केला जाणार आहे. यातील अकरावीच्या वर्षाला बहुतांश विद्यार्थी हे रेस्ट ईअर मानतात. या वर्षामध्ये बारावीची तयारी करण्यावर भर देतात. त्यामुळे निकालाच्या सुत्राने बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप उडवली आहे. त्यांना गुणांची चिंता लागली आहे.
जिल्ह्यातील एकूण ५२,२९९ विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात सीबीएसईचे ५५०, तर राज्य शिक्षण मंडळाचे (स्टेट बोर्डाचे) ५१,७४९ विद्यार्थी आहेत. राज्य शिक्षण मंडळाने सीबीएसई शिक्षण मंडळाच्या धोरणावर अवलंबून असणारे जाहीर केले. दहावीमध्ये अभ्यास करून चांगले गुण मिळवले. पुढे बारावीचे वर्ष महत्त्वाचे असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. त्यातच वार्षिक परीक्षाही झाली नाही. आता बारावीचे मूल्यमापन करताना अकरावीतील ३० टक्के गुणांचा विचार केला जाणार आहे. त्याचा फटका बसण्याची भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे.
पॉईंटर
जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी
सीबीएसईचे विद्यार्थी : ५५०
स्टेट बोर्डाचे विद्यार्थी : ५१७४९
प्रतिक्रिया
३० टक्के सूत्रं गणित बिघडवणार
कोरोनामुळे बारावीचा अंतिम निकाल हा दहावी, अकरावी आणि बारावीच्या गुणांच्या आधारे जाहीर होणार आहे. अकरावीला बहुतांश विद्यार्थ्यांना कमी गुण असतात. त्याचा बारावीच्या गुणांवर परिणाम होणार आहे. कमी गुण मिळाल्यास पुन्हा परीक्षा देण्याची आमची तयारी आहे.
- संगीता घाडीगावकर, रूईकर कॉलनी
बारावीमध्ये वर्षभर तयारी करायची असल्याने अकरावीमध्ये केवळ उत्तीर्ण होण्यापुरता अभ्यास केला. आता यावर्षी परीक्षा होणार नाही. बारावीच्या अंतिम मूल्यांकनामध्ये अकरावीच्या गुणांचा विचार केला जाणार असल्याने गुणांबाबत थोडी चिंता वाटत आहे.
- तेजस पोवार, वळीवडे
विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा
बारावीच्या विद्यार्थ्यांना यावर्षी मिळणाऱ्या गुणांचा अधिक विचार करू नये. यापुढे त्यांना काही प्रवेश परीक्षा द्याव्या लागणार आहेत. त्यातील चांगल्या यशासाठी अभ्यासावर फोकस ठेवावा.
- डॉ. सरदार जाधव, प्राचार्य, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल.
दहावी, अकरावीतील गुण हे बेस्ट ऑफ थ्री सुत्रानुसार मिळणार आहेत. त्यामुळे शक्यतो विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी यापुढील परीक्षा आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ची शैक्षणिक गुणवत्ता, कौशल्य वाढवावीत.
- मुकुंद कांबळे, शिक्षक, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय.
फोटो (१८०७२०२१-कोल-संगीता घाडीगावकर (एचएससी), तेजस पोवार (एचएससी), सरदार जाधव (प्राचार्य), मुकुंद कांबळे (शिक्षक)