चाळीस कोटींची उलाढाल ठप्प
By Admin | Updated: August 12, 2014 00:41 IST2014-08-12T00:25:47+5:302014-08-12T00:41:11+5:30
‘पेट्रोल पंप बंद’चा परिणाम : वाहनधारकांना करावी लागली पायपीट

चाळीस कोटींची उलाढाल ठप्प
कोल्हापूर : राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी आज, सोमवारी पुकारलेल्या एक दिवसाच्या ‘बंद’मुळे वाहनधारकांना पायपीट करावी लागली; तर शहरातील रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती. बंदमुळे जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेलची मिळून सुमारे ४० कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. उद्या, मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. पेट्रोल पंप चालकांनी बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) व मुंबईतील कच्च्या तेलावरील जकात अशा वि
विध करांमुळे राज्यात पेट्रोल व डिझेल पाच ते सहा रुपयांनी जास्त दराने वाहनचालकांना द्यावे लागते. याविरोधात ‘फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन’ (फामपेडा) या शिखर संघटनेने आज, सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून ते उद्या, मंगळवारी सकाळी सहा वाजेपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवले.
या बंदमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २३० पेट्रोल पंप चालक सहभागी झाले होते. सर्वच पेट्रोल पंपांवर ‘आज पेट्रोल पंप बंद आहे’ असे फलक लावण्यात आले होते.
दरम्यान, काल, रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार याची पूर्वकल्पना असल्यामुळे वाहनचालकांनी अगोदरच पेट्रोलची टाकी पूर्ण भरून घेतली होती. त्यामुळे आज वाहनचालकांना म्हणावी तशी पेट्रोलची चणचण भासली नाही. मात्र, काही वाहनचालकांना आज पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती नसल्याने त्यांची कुचंबणा झाली. काही वाहनांचे पेट्रोल संपल्याने चालक दुचाकी ढकलत रस्त्यावरून जात होते. सकाळपासून शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी दिसून येत होती. हीच स्थिती ग्रामीण भागात होती. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप बंद होते. पण, अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप चालकांनी तेल उपलब्ध करून दिले. (प्रतिनिधी)
एस.टी.ला चणचण जाणवली नाही
दोन वर्र्षांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसेस खासगी पेट्रोल पंपावर डिझेल भरतात. आज पेट्रोल पंप चालकांचा बंद असल्यामुळे एस. टी. प्रशासनाने अगोदरच डिझेलचा साठा करून ठेवला होता. त्यामुळे एस.टी.ला डिझेलची चणचण जाणवली नाही.
पदाधिकारी मुंबईत भेट घेणार
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज, सोमवारी रत्नागिरी येथे दौऱ्यावर येणार होते. पण त्यांचा दौरा अचानक रद्द झाला. या दौऱ्यात ‘ फामपेडा’चे अध्यक्ष उदय लोध याप्रश्नी निवेदन देणार होते. परंतु, दौरा रद्द झाल्याने या संघटनेचे पदाधिकारी आता मुंबईत भेट घेणार असल्याचे कोल्हापूर पेट्रोल-डिझेल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजकुमार माणगावे यांनी सांगितले.
या मागण्यांबाबत राज्य सरकारने लक्ष घालावे. यावर निर्णय न घेतल्यास पुढील काळात ‘फामपेडा’ पेट्रोल पंप बंद ठेवील.
- गजकुमार माणगावे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पेट्रोल-डिझेल असोसिएशन.