दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली
By Admin | Updated: August 4, 2015 00:30 IST2015-08-04T00:30:55+5:302015-08-04T00:30:55+5:30
वस्त्रनगरी इचलकरंजी : ६० टक्के कापड उत्पादन ठप्प; सायझिंग संप, ‘बालोत्रा बंद’चा परिणाम

दररोज ९० कोटींची उलाढाल थंडावली
इचलकरंजी : शहरात सुरू असलेला सायझिंग कामगारांचा संप आणि बालोत्रा-राजस्थान येथील बंद असलेल्या कापडावर प्रक्रिया करणारे प्रोसेसर्स याचा परिणाम यंत्रमाग कारखान्यांवर झालाा असून, सुमारे ६० टक्के कापड उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे वस्त्रनगरीमध्ये दररोज होणारी ९० कोटी रुपयांची उलाढाल थंडावली आहे.यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या सुधारित किमान वेतनाची अंमलबजावणी ताबडतोब केली पाहिजे, या मागणीसाठी सायझिंग-वार्पिंग कामगार संघटनेने सुरू केलेल्या संपाला दोन आठवडे उलटले. त्यामुळे शहर व परिसरातील सुमारे १४० सायझिंग कारखाने बंद पडले असून, त्यांचेही दररोज होणाऱ्या सूत बिमांचे उत्पादन ठप्प झाले आहे. सूत बाजारामध्ये दररोज होणारी सुताची उलाढाल मंदावली असून, साठ कोटींहून अधिक रुपयांच्या सुताची उलाढाल थांबली आहे.
सायझिंग कारखान्यांकडून यंत्रमागासाठी अत्यावश्यक असलेल्या सुताची बिमे मिळत नसल्याने आता शहर व परिसरातील साठ टक्के यंत्रमाग बंद पडले आहेत. त्यातून होणारे दररोज ९० कोटी रुपयांचे कापड उत्पादनसुद्धा ठप्प झाले आहे. आणखीन आठवडाभर हा संप चालला, तर उर्वरित यंत्रमागसुद्धा बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.
आॅटोलूमसाठी लागणाऱ्या सूत बिमांच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शहरात दररोज होणारी सुताची आवक थंडावली आहे. बाजारामध्ये गेल्या आठवड्याभरापासून प्रतिकिलो सुताच्या दरात दहा ते पंधरा रुपयांनी घट झाली असली, तरीसुद्धा गिऱ्हाईक मिळत नसल्याने सुताची खरेदी-विक्री होईनाशी झाली आहे.
दरम्यान, राजस्थानातील बालोत्रा येथे असलेले प्रोसेसर्स प्रदूषणाच्या कारणामुळे १५ मेपासून बंद करण्यात आले आहेत. याबाबतची सुनावणी नवी दिल्ली येथील हरित लवादासमोर सुरू असून, ३१ जुलै रोजी होणारी सुनावणी आता ७ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. हरित लवादासमोरील सुनावणी अत्यंत कडक असल्यामुळे त्यादिवशीसुद्धा काही तोडगा निघेल किंवा निर्णय होईल, याबाबतची साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस येथील वस्त्रोद्योगाची परिस्थिती दयनीय होत आहे. (प्रतिनिधी)
सूत कापड वाहतूक अडचणीत
इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योगाच्या बिघडणाऱ्या स्थितीमुळे शहरातील कापड व सूत वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. बालोत्र्याला दररोज वीस ट्रक जाणारे कापड बंद झाले असून, पालीस जाणाऱ्या कापडाच्या वाहतुकीवर ७० टक्के परिणाम झाला आहे. तर दररोज ८० ट्रक येणारे सूत आता सरासरी दहा ते पंधरा ट्रक इतकेच येत आहे, अशी माहिती इचलकरंजी ट्रान्स्पोर्ट असोसिएशनचे आनंदराव नेमिष्टे यांनी सांगितली.