शिरोळमधील उद्योग अडचणीत
By Admin | Updated: September 1, 2015 23:26 IST2015-09-01T23:21:23+5:302015-09-01T23:26:45+5:30
कामगारांचा प्रश्न गंभीर : तालुक्यातील औद्योगिक वसाहती मंदीच्या चक्रव्यूहात

शिरोळमधील उद्योग अडचणीत
संतोष बामणे - जयसिंगपूर शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक उद्योग मंदीच्या चक्रव्युहात अडकले असून, या परिसरातील अनेक उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे उद्योगावर अवलंबून असणारे व्यवसायिक व कामगार आर्थिक अरिष्टात सापडला असून, कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. इचलकरंजीतील संपाचा परिणामही शिरोळ तालुक्यात झाला आहे.तालुक्यात ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहत, छ. शाहू महाराज औद्योगिक वसाहत व पार्वती औद्योगिक वसाहत असून, याठिकाणी अनेक मोठे व लघु उद्योग आहेत. यामध्ये शेती उत्पादनावर आधारित, कापड उद्योग, मशिनरी, अॉटो पार्ट असे उद्योग आहेत. तसेच जिल्ह्यातील व परराज्यातील अनेक कामगार येथे काम करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मंदीचे सावट आल्याने विविध उद्योग अडचणीत सापडले आहेत. शंभरहून अधिक छोट्या-मोठ्या उद्योगांना काम नसल्यामुळे आर्थिक फटका बसत आहे.वसाहतीमध्ये छोटे-मोठे उद्योग असून, सर्व व्यवसाय एकमेकांवर अवलंबून आहेत. येथील माल सातासमुद्रापार पोहोचला आहे. तालुक्यामध्ये कामगारांची आर्थिक घडी बसविणाऱ्या या औद्योगिक वसाहतीला अवकळा लागली आहे. शासनाने वीज दरवाढ केल्याने उद्योगांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे येथील उद्योग परराज्यात स्थलांतरीत होत आहेत.
जागतिक मंदीमुळे शिरोळ तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उत्पादित होणारे स्पेअरपार्टचे काम कमी झाल्यामुळे छोटे उद्योग बंद पडत आहेत. यामुळे यावर अवलंबून असणारे घटक आर्थिक अरिष्टात सापडले आहेत. शासनाने वीज बिलाबाबत लवकर तोडगा काढला पाहिजे, अन्यथा उद्योग इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.
- दिलीप पाटील-कोथळीकर, अध्यक्ष, ल. क. अकिवाटे वसाहत
औद्योगिक क्षेत्रासाठी सध्या असणारी वीज बिलाची आकारणी न परवडणारी आहे. शासनाने वीज बिलाची दरवाढ कमी करून औद्योगिक वसाहतींना चालना देण्याची गरज आहे. उद्योग टिकले तरच कामगार टिकतील, अन्यथा बेरोजगारीची समस्या वाढण्याची शक्यता आहे. डॉ. अशोकराव माने, अध्यक्ष, शाहू औद्योगिक वसाहत
इचलकरंजी येथील कामगारांच्या संपाचा यड्रावमधील पार्वती इंडस्ट्रीजवरही परिणाम झाला आहे. वस्त्रोद्योग हे एकमेकांवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारे उद्योगही बंद पडले आहेत. यामुळे कामगार व मालक दोघेही भरडे जात असून, यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
- सचिन मगदूम, यंत्रमाग उद्योजक, यड्राव