शिराळे वारुण येथे तुळशी पूजन
By Admin | Updated: November 28, 2015 00:12 IST2015-11-28T00:01:52+5:302015-11-28T00:12:45+5:30
स्त्रीत्वाला सलाम करणारी प्रथा : तीन वर्षांपासून तुळशी विवाहास फाटा

शिराळे वारुण येथे तुळशी पूजन
शित्तूर वारुण : तुळशी विवाहाऐवजी तुळशी पूजन करण्याची सभ्य, सुसंस्कृत आणि स्त्रीत्वाला सलाम करणारी प्रथा शाहूवाडी तालुक्यामधील शिराळे वारुण हे गाव गेल्या तीन वर्षांपासून निष्ठेने पाळत आहे.
वैदिक धर्म ग्रंथामधील कथेनुसार प्रजाहित दक्ष राजा जालंदर आणि त्याची पत्नी वृंदा अर्थात तुलसी ही चारित्र्यसंपन्न होती. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा सुखी आणि समृद्ध होती. विष्णूने वृंदाचे (तुलसी) पतिव्रत्य खंडन केले. त्यामुळे वृंदाने आत्महत्या केली. जालंदरने वृंदाच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिचा अंत्यविधी करण्याअगोदर तुलसीचे रोप लावले आणि स्वत: आत्महत्या केली. ज्या विष्णूने वृंदाचे पतिव्रत्य भंग केले त्याच्याशीच विवाह लावण्याची प्रथा रूढ झाली.
आपल्या आई-वडिलांचे लग्न एकदाच होते. मग तुलसीचे लग्न वारंवार का? आणि चारित्र्यहनन करणाऱ्या विष्णुशीच का? ही वृंदाची अर्थात तुलसीची विटंबना नसून समस्त महिलावर्गांचीच विटंबना आहे, असं मानून गेल्या तीन वर्षांपासून या गावामधील विवेकशील तरुणांनी ठिकठिकाणी बैठका घेऊन प्रबोधन फेरी काढली. दरम्यान, घरोघरी जाणीव-जागृतीसाठी पत्रके वाटली. गावच्या सज्ञान आजी-माजी सरपंचांनी यावेळी निर्णायक सहभाग नोंदवला. गावातील विविध सण, उत्सव साजरा करणाऱ्या तरुण मंडळांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
तुळशीचे आयुर्वेदिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही दिवसा आणि रात्रीही आॅक्सिजन (प्राणवायू) सोडते. ताप, खोकला आणि नायटासारख्या त्वचारोगावरही औषधी वनस्पती म्हणून तुळशीचा उपयोग होतो. विवेकाला घायाळ करणाऱ्या कथेमध्ये वृंदा अर्थात तुलसी ही चारित्र्यसंपन्न असून, तिचा
वारंवार विवाह लावण्याच्या अनिष्ट प्रथेला फाटा देत या गावामध्ये सन्मानाने हळदी, कुंकू लावून पुष्प अर्पण करून तुलसीचे पूजन करण्यात आले.
‘तुलसी विवाह’ ही कथा समस्त महिलावर्गाची बदनामी करणारी आहे, असं मानून आम्ही सामुदायिकरीत्या ‘तुलसी पूजन’ हा उत्सव संपूर्ण गावामध्ये साजरा करतो. यासाठी लोकांना ‘तुलसी पूजन’ करण्याचे या निमित्ताने विनंती आणि आवाहन करण्यात आले होते.
संजय यादव : (स्थानिक नागरिक)