टोलमुक्तीचा १ जूनचा मुहूर्त नाहीच !
By Admin | Updated: May 30, 2015 01:02 IST2015-05-30T01:01:56+5:302015-05-30T01:02:07+5:30
फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण : एमएच ०९ बाबत १५ जूननंतरच अधिसूचना शक्य; आश्वासन हवेतच

टोलमुक्तीचा १ जूनचा मुहूर्त नाहीच !
कोल्हापूर : कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पामधून तयार केलेल्या रस्त्यांचा फेरमूल्यांकन सर्व्हे पूर्ण झाला आहे. या रस्त्यासाठी नेमलेली फेरमूल्यांकन समिती पुढील दहा दिवसांत याबाबतचा अहवाल राज्य शासनाला सादर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावरून सोमवार (दि. १) पासून कोल्हापूर पासिंगची (एमएच ०९) वाहने टोलमधून वगळणार व टोलमुक्ती करणार नसल्याचे दिसून येत आहेत.
राज्य शासन एमएच ०९ बाबतची अधिसूचना १५ जूननंतर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे १ जूनपासून भाजप-शिवसेनेने कोल्हापूर टोलमुक्तीचे दिलेले आश्वासन हवेतच विरण्याची शक्यता आहे.
कोल्हापुरात आय. आर. बी. कंपनीने सुमारे ४९.४९ किलोमीटरचे रस्ते केले; पण केलेले रस्ते खराब असल्याचा शहरवासीयांबरोबर सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीचा आरोप आहे. यासाठी यापूर्वी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात खराब रस्ते तपासणी व मूल्यांकनासाठी
समिती नेमली. पण, या समितीने कधी अहवाल दिला, त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. काँग्रेसच्या जागी भाजप -शिवसेनेची सत्ता आली. या दोन्ही पक्षांनी कोल्हापूरचा टोल कोणत्याही स्थितीत घालवू, असे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. या सरकारने आय. आर. बी.ने केलेल्या रस्त्यांसाठी राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापक संतोषकुमार यांच्या अध्यक्षतेखाली फेरमूल्यांकन समिती नेमली. या समितीमध्ये शहर अभियंता यांच्यासह वास्तुरचनाकार राजू सावंत, आदींचा सहभाग आहे.
दहा दिवसांत शासनाला अहवाल देणार
मध्यंतरी या फेरमूल्यांकन समितीने शहरातील विविध भागांची पाहणी करून सर्व्हे केला. जवळपास समितीचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. अजूनही या समितीचे अहवालाचे काम सुरू असून पुढील दहा दिवसांत ही समिती अहवाल तयार करणार आहे व सदस्यांची मते अजमावून घेण्यासाठी बैठक घेणार आहे. त्यानंतर ही फेरमूल्यांकन समिती हा अहवाल राज्य शासनाला सादर करणार आहे. राज्य शासन यावर विचार करून कोल्हापूर टोलमुक्त करणार की एमएच०९ क्रमांकाची वाहने वगळणार, यावर निर्णय होणार आहे.