अपूर्ण कामांबाबत मंगळवारी बैठक
By Admin | Updated: November 28, 2014 00:39 IST2014-11-28T00:38:41+5:302014-11-28T00:39:30+5:30
रस्ते प्रकल्प : कोल्हापुरात बैठक नको : ‘आयआरबी’चे पत्र

अपूर्ण कामांबाबत मंगळवारी बैठक
कोल्हापूर : शहरातील अपूर्ण कामांबाबत दर पंधरा दिवसांनी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, आयआरबी व महापालिका यांच्यात कोल्हापुरात बैठक घेण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापुरातील बैठकीस ‘आयआरबी’ने नकार दिला आहे.
तरीही मंगळवारी (दि. २) कोल्हापुरात आढावा बैठक होणार आहे. अपूर्ण कामांबाबत यानिमित्त पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज, गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
शहर एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पातील काही रस्ते अपूर्ण आहेत. रस्त्यांवरील विजेचे दिवे, युटिलिटी शिफ्टिंग, रस्त्यांशेजारील चॅनेल्स, आदी अनेक अपूर्ण कामे ‘आयआरबी’ने करणे गरजेचे आहे. ही कामे करण्यास कोल्हापुरात सुरक्षित वातावरण नाही, असे सांगून आयआरबी चालढकल करीत आहे. प्रकल्पातील अपूर्ण कामे कधी होणार याबाबत रस्ते विकास महामंडळासह आयआरबीच्या प्रतिनिधींशी बैठकीचे नियोजन केले असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
प्रकल्पाची अपूर्ण कामे करण्यासाठी कोल्हापुरात असुरक्षित वातावरण आहे. तसेच बैठकीलाही आयआरबीचा प्रतिनिधी येणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे ही आढावा बैठक पुणे किंवा मुंबईत घ्यावी, अशी मागणी आयआरबीने महामंडळाकडे केली आहे. प्रकल्प कोल्हापुरात सुरू आहे. अपूर्ण कामांबाबत काही शंका असल्यास एकत्रित भेटी देणेही सोपे होणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत आढावा बैठक कोल्हापुरातच होईल, असे महामंडळाला आयुक्तांनी कळविले आहे. (प्रतिनिधी
प्रकल्पाची देखरेख करण्याची जबाबदारी महामंडळाची असल्याने महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत होणे गरजेचे आहे. प्रकल्पातील त्रुटी व अपूर्ण कामांवर लक्ष ठेवणे यामुळे सोयीचे होईल. कोल्हापुरात कार्यालय सुरू करण्याबाबत शासनाला पत्र लिहिले आहे. दर पंधरा दिवसांत प्रकल्पाच्या कामाबाबत कोल्हापुरात बैठक घेतली जाणार आहे.
- विजयालक्ष्मी बिदरी, आयुक्त