नगरसेवकाचा बंगला पेटविण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: November 12, 2014 00:17 IST2014-11-12T00:07:27+5:302014-11-12T00:17:44+5:30
गडहिंग्लज येथील प्रकार : दुचाकी भस्मसात, सोमवारी मध्यरात्री अज्ञातांचे कृत्य

नगरसेवकाचा बंगला पेटविण्याचा प्रयत्न
गडहिंग्लज : गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आणि नगरपालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते रामदास शिवाजी कुराडे यांच्या राहत्या बंगल्यात कापडाचा पेटलेला बोळा टाकून बंगला पेटविण्याचा प्रयत्न झाला. बंगल्याच्या पोर्चमध्ये लावलेली त्यांची (एमएच०९डीबी ८०९१) दुचाकीदेखील पेटविण्यात आली. काल, सोमवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेत सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असून, याप्रकरणी अज्ञातांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील गडहिंग्लज हायस्कूलनजीक काळभैरी रोडवर कुराडे यांचा ‘आई’ नावाचा बंगला आहे. त्यांनी नेहमीप्रमाणे आपली होंडा अॅक्टिव्हा ही दुचाकी बंगल्याच्या पोर्चमध्ये लावली होती.
काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी कापडी बोळा पेटवून त्यांची दुचाकी जाळली. व्हरांड्यातील खिडकीचा झाप उचकटून कापडाचे पेटते बोळे आत टाकले. त्यामुळे आतील गादी व खिडकीचे पडदे जळालेले आहेत. पेटलेल्या गाडीच्या आवाजामुळे शेजारील नागरिक जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आला.
घटनास्थळी जमलेले नागरिक व त्यांच्या कुटुंबीयांनी पाणी टाकून पेटलेली गादी विझविली. मात्र, दुचाकी जळून भस्मसात झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक सागर पाटील, पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांनी भेट दिली. कुराडे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे तपास करीत आहेत.
राष्ट्रवादीच्या बैठकीत निषेध
नगराध्यक्ष लक्ष्मी घुगरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बैठक झाली. काळिमा फासणाऱ्या या भ्याड कृत्याचा निषेध नोंदवून शहरातील राजकीय वातावरण बिघडवून दहशत माजविण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला गेला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
यावेळी उपनगराध्यक्ष कावेरी चौगुले, वसंत यमगेकर, प्रा. रमेश पाटील, सुनील गुरव, सुरेश कोळकी यांच्यासह नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार मुश्रीफ यांची भेट
आमदार हसन मुश्रीफ यांनी दुपारी घटनास्थळी भेट दिली. कुराडे यांच्याकडून त्यांनी घडल्या प्रकाराची माहिती घेऊन या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.
आज निषेध मोर्चा
भ्याड कृत्याचा निषेध, आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी उद्या, बुधवारी सकाळी १० वाजता येथील लक्ष्मी मंदिरापासून निषेध मोर्चा निघणार .
गडहिंग्लजच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला आहे. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याचे समजते. त्या चिठ्ठीतील मजकुरावरून राजकीय द्वेषातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.
कुराडे यांच्या बंगल्याच्या पाठीमागील बाजूस त्यांचा काजूचा कारखाना आहे. कारखान्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे आरोपींचे फुटेज त्यामध्ये चित्रित होणे अपेक्षित होते. मात्र, या घटनेचे कोणतेही फुटेज मिळाले नसल्याचे समजते.
सोमवारी मध्यरात्री अज्ञातांनी गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष रामदास कुराडे यांचा बंगला पेटविण्याचा प्रयत्न केला. ही बातमी वाऱ्यासारखी शहरात पसरल्यानंतर त्यांच्या बंगल्यासमोर जमलेले नागरिक.