देवस्थानची जमीन लाटण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: July 23, 2016 01:28 IST2016-07-23T01:11:54+5:302016-07-23T01:28:20+5:30

समितीची सीआयडी चौकशी : शाहूवाडीतील हजार एकर जागा वादाच्या भोवऱ्यात; पेठवडगावसह मुंबईच्या कंपन्यांवर गुन्हा

Trying to land the land of Devasthan | देवस्थानची जमीन लाटण्याचा प्रयत्न

देवस्थानची जमीन लाटण्याचा प्रयत्न

एकनाथ पाटील --कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे ‘सीआयडी’ चौकशीत निष्पन्न झाले आहे. देवस्थान सचिव शुभांगी साठे यांच्यासह समितीच्या लेटरपॅडवर सदस्यांच्या बोगस सह्या व शिक्के मारून मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स पेठवडगाव या कंपन्यांच्या नावे ही जमीन चढविण्याचा प्रयत्न झाला आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात झाल्याने समितीचे अठरा सदस्य व कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. या समितीवर पदे भूषविलेल्या काही सदस्यांनी चौकशी होऊ नये, यासाठी पोलिसांच्या भोवती ‘राजकीय फिल्डिंग’ लावली आहे. या भूखंड गैरव्यवहारात मोठे रॅकेट असल्याचा दावा खुद्द पोलिसांनीच केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थान समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील ३०६५ मंदिरे आणि त्यांच्या संपत्तीचे व्यवस्थापन आहे. समितीकडे २५ हजार एकर शेतजमीन आहे. या जमिनीचा गैरव्यवहार झाल्यासंबंधीची वृत्तमालिका ‘लोकमत’ मध्ये प्रसिध्द झाल्यावर घोटाळा प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार कोल्हापूर परिक्षेत्राच्या सीआयडीच्या विशेष पथकातर्फे चौकशी सुरू असताना शाहूवाडी तालुक्यातील एक हजार एकर जमीन मुंबईतील देव रिर्सोसेस इंडिया व एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स पेठवडगाव यांच्या नावे करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी देवस्थान समिती सचिव शुभांगी साठे यांच्याकडे चौकशी केली असता असा कोणताही आदेश झाला नसून आपल्या कुणीतरी बोगस सह्या केल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यासंबंधी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार १६ आॅगस्ट २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या मुदतीत देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात हा प्रकार घडला आहे. कार्यालयातील लेटरपॅड, व शिक्क्यांचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे सादर करून त्या दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तींनी देवस्थान समितीची फसवणूक केल्याची फिर्याद शिवाजी साताप्पा साळवी (वय ५४, रा. मोहिते कॉलनी, कळंबा) यांनी दिली आहे. साळवी हे समितीचे कर्मचारीच आहेत. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा फसवणूक कलम (४२० ४६५, ४६८, ४७१)प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांनी शाहूवाडी तहसीलदारांना सादर झालेला प्रस्ताव हस्तगत करून त्यावर पुरावेसदृश ५०० पानांचा चौकशी अहवाल तयार केला आहे. कागदपत्रांवरील बोगस सह्यांचे नमुने पुणे येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहेत.
त्यासाठी पाच महिन्यांचे सह्या असलेले लेखी रेकॉर्ड पोलिसांनी देवस्थान समितीच्या कार्यालयातून चौकशीसाठी हस्तगत केले आहे. या चौकशीमध्ये मोठे रॅकेट समोर येणार असल्याने प्रशासकीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
ठराव घुसडण्याचा प्रयत्न
समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी कोणताही आदेश किंवा पत्र दिले नसताना दि. १८ आॅगस्ट २०१५ मध्ये जावक रजिस्टरमधील पान नं. २३ वर देव वशि/११२ व देव वशि १५९९/२०१५ नोंदी केल्या आहेत. हा प्रस्ताव खरा असल्याचे भासवून शाहूवाडी तहसीलदारांना सादर केला आहे. कागदपत्रांमध्ये फेरफार व रजिस्टरमध्ये ठराव घुसडण्याचा प्रयत्न समिती सदस्यांपैकीच कोणीतरी केला आहे. हे धाडस करणारे चार-पाच सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत. ते कोण, हे आता चौकशीनंतर पुढे येणार आहे. या समितीत राजकीय हस्तक्षेप असल्याने पोलिस अतिशय थंड डोक्याने तपास करत आहेत.

माध्यमांपासून लपवा-लपवी
देवस्थान समितीचा शाहूवाडी तालुक्यातील मोठा भूखंड लाटण्याचा प्रकार घडून त्यासंबंधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही तो माध्यमापर्यंत पोहोचू न देण्यासाठी प्रशासन व राजकीय स्तरावरून मोठी फिल्डिंग लावण्यात आली होती. त्यामुळे दोन महिने गुन्हा दाखल होऊनही याची माध्यमांना कल्पना नव्हती. पोलिस ठाण्याच्या पातळीवरही कमालीची गुप्तता पाळली आहे.


मुख्यमंत्र्यांना अहवाल
कोल्हापूर परिक्षेत्रातील भूखंड गैरव्यवहाराची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी)तर्फे सुरू आहे. चौकशीमध्ये हा प्रकार पुढे येताच त्यासंबंधीचा लेखी अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केल्याचे सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.


तपास अधिकाऱ्यांची बदली
या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अमित मस्के यांची कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे बदली झाली. त्यांना शुक्रवारीच कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे हा तपास नवे अधिकारी दादासाहेब गोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


देवस्थान समितीची शाहूवाडी तालुक्यातील शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाला आहे हे खरे आहे. आरोपींनी माझ्यासह समितीच्या सदस्यांच्या बोगस सह्या केल्या आहेत. आम्ही रितसर तक्रार दिली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
- शुभांगी साठे,
सचिव, देवस्थान समिती

Web Title: Trying to land the land of Devasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.