व्यापाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: December 23, 2015 01:24 IST2015-12-23T00:48:24+5:302015-12-23T01:24:25+5:30
पाचजणांना अटक : दोघे फरार; दगडी शिप्पूरमधील प्रकार

व्यापाऱ्यास जिवे मारण्याचा प्रयत्न
गडहिंग्लज : नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी जाणाऱ्या व्यापाऱ्यास पूर्ववैमनस्यातून दगडी शिप्पूर गावानजीक रस्त्यात गाठून त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. प्रसंगावधान राखून व्यापाऱ्याने त्यांच्या तावडीतून सुटका करून गाव गाठले. तेथे त्याने आरडाओरडा केल्यानंतर जमलेल्या ग्रामस्थांनी पाठलाग करणाऱ्या पाच संशयितांना पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी सातजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (दि. २१) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.मारुती कृष्णा पाटील (वय ४३, रा. शिप्पूर तर्फ आजरा, ता. गडहिंग्लज) असे त्या व्यापाऱ्याचे नाव आहे, तर संदीप नारायण गुंडप (२३, रा. कडगाव, ता. गडहिंग्लज), पवन रामचंद्र सावरे (२१, रा. भीमनगर, गडहिंग्लज), काशीनाथ कृष्णा कांबळे (२०, रा. गणेश मंदिरनजीक गांधीनगर, गडहिंग्लज), सूरज तानाजी बसरीकट्टी (२१, रा. माणगाव, ता. चंदगड) व वैभव संभाजी ठोंबरे (रा. संभाजीनगर, गडहिंग्लज) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. विश्वनाथ आनंदा रायकर (रा. शिप्पूर तर्फ आजरा) व सुजित पाटील (रा. गडहिंग्लज) हे दोघे फरार आहेत.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शिप्पूर तर्फ आजरा येथील मारुती कृष्णा पाटील यांचे गडहिंग्लज येथील चर्च रोडवर कालिका बोअरवेल्स नावाचे इलेक्ट्रिक दुकान आहे. सोमवारी रात्री नऊच्या सुमारास नेहमीप्रमाणे ते दुकान बंद करून मोटारसायकलवरून गावी जात होते. त्यावेळी जखेवाडी आणि शिप्पूरदरम्यानच्या आंबेओहोळ ओढ्यानजीकच्या पुलाजवळ पेट्रोलच्या बाटल्या, काठ्या व लोखंडी सळ्यासह दबा धरून बसलेल्या संशयितांनी त्यांना रस्त्यात अडविले.
एकाने त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतले, तर दुसऱ्याने काडी लावण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून पाटील यांनी गाडीचा वेग वाढवून त्यांच्या ताब्यातून सुटका करून घेतली मात्र, संशयितांनी त्यांचा पाठलाग सुरूच ठेवला होता. गावच्या वेशीत पोहोचताच पाटील यांनी आरडाओरडा केला. यामुळे गावकरी जमा झाले. एवढ्यात त्याठिकाणी संशयितदेखील पोहोचले. घडलेला प्रकार ऐकून संतप्त गावकऱ्यांनी त्यांना चांगला चोप दिला. पोलिसांना बोलावून गुन्ह्यात वापरलेल्या साहित्यासह संशयितांना त्यांच्या ताब्यात दिले. त्यापैकी पाचजणांना पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार आहेत. मारुती पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पूर्ववैमनस्यातून प्रकार
२२ आॅक्टोबर २०१५ रोजी रात्री गावातील दुर्गामाता मिरवणुकीत नाचण्यास नकार दिल्यामुळे संशयित आरोपी विश्वनाथ रायकर यास गावातील काही लोकांनी घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार त्याच्या पत्नीने पोलिसांत दिली होती. मारुती हाच आपणास मारहाण करणाऱ्यांचा म्होरक्या असल्याच्या रागातून त्याचा काटा काढण्याच्या उद्देशानेच विश्वनाथने हा प्रकार केल्याची चर्चा आहे. त्यादिशेने पोलीस तपास सुरू आहे.
मारुती यांची वेळ बरी म्हणून...
संशयित आरोपींच्या तावडीतून सुटका करून मारुती पाटील गावच्या वेशीत पोहोचले. त्यावेळी एका घरातील घरगुती कार्यक्रमानिमित्त आजूबाजूची माणसे एकत्र जमली होती. आरडाओरडा ऐकून त्यांनी वेशीत धाव घेतली आणि मारुती यांची सुखरूप सुटका करण्याबरोबरच संशयितांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.