मामेभावाला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: July 20, 2015 01:07 IST2015-07-20T01:07:21+5:302015-07-20T01:07:51+5:30

सीपीआर आवारातील घटना : कौटुंबिक वादाचे पर्यवसान; दोन्ही बाजूंचे आठजण ताब्यात

Trying to kill the offender | मामेभावाला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न

मामेभावाला आपटून ठार मारण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : चिंचवडे (ता. करवीर) येथे रविवारी सकाळी मामेभावात झालेल्या हाणामारीचे पडसाद पुन्हा सीपीआर आवारात उमटले. वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या मामेभावास चौघा जणांनी जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये अंकुश दगडू मोहिते (वय ३२) हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या आठजणांना ताब्यात घेतले.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अंकुश दगडू मोहिते व सर्जेराव आनंदा सावंत हे दोघे मामेभाऊ आहेत. त्यांच्यात पूर्वीपासून कौटुंबिक वाद आहे. रविवारी सकाळी अंकुशच्या घरी पाहुणे रणजित साठे हे आले होते. यावेळी सर्जेराव सावंत याच्याशी वाद झाला. त्यातून या मोहिते व सावंत या दोन कुटुंबांत जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूंचे चौघेजण जखमी झाले. त्यानंतर दोघांनीही करवीर पोलिसांत परस्परविरोधी फिर्याद दिली. पोलिसांनी त्यांना सीपीआरमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यास पाठविले. दोन कुटुंबांतील जखमी सीपीआरमध्ये आमने-सामने आल्याने गोंधळ उडाला. याठिकाणी ते एकमेकांस शिवीगाळ करू लागले. त्यामुळे सीपीआर चौकीतील हवालदाराने मोहिते कुटुंबीयास सीपीआर आवारातील मारुती मंदिराशेजारी थांबण्यास सांगितले. त्यानुसार अंकुश, त्याची आई हौसाबाई, चुलते मधुकर व चुलती शोभा असे चौघेजण बसून राहिले. यावेळी सर्जेराव सावंत व त्याचे नातेवाईक अपघात विभागात उपचार घेत होते. उपचारानंतर बाहेर आल्यानंतर सर्जेराव सावंत, भैरवनाथ सावंत व सागर सावंत या तिघांनी अंकुशला ठार मारण्याचा उद्देशाने जमिनीवर आपटून मारहाण केली. दरम्यान, या घटनेची माहिती लक्ष्मीपुरी व करवीर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, करवीर पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस उपनिरीक्षक युवराज आठरे यांनी सीपीआरमध्ये भेट देऊन मारहाणीची माहिती घेतली. यावेळी दोन्ही बाजूंच्या सात ते आठ संशयितांना ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आणले. याठिकाणी काही संघटनेच्या नेतेमंडळींनी दोन्ही कुटुंबांत मध्यस्थी करत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करून संशयितांना अटक केली.
...संपवा त्याला
सर्जेराव सावंत याची आत्या सदर बझारमध्ये राहते. तिला मारहाणीची माहिती मिळाल्याने ती सीपीआरमध्ये आली. मारुती मंदिरासमोर मोहिते कुटुंबीय बसल्याचे पाहून तिने अंकुशला संपवा, अशी चेतावणी देताच सर्जेराव सावंत, भैरवनाथ सावंत, सागर सावंत या तिघांनी थेट त्याच्यावर हल्ला केला. त्याचे दोन्ही पाय धरून फिरवून जमिनीवर आपटले. त्यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तो बेशुद्ध पडला, अशी माहिती सीपीआरच्या सुरक्षा रक्षकाने लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.
सुरक्षा रक्षकांमुळे अनर्थ टळला
‘सीपीआर’चे सुरक्षा रक्षक रंगराव पाटील, आर. पी. जाधव, रंगराव मोरे, बसवराज चौगले हे चौघेजण सकाळी ड्युटीवर होते. त्यांच्यासमोरच अंकुशला जमिनीवर आपटले. हा प्रकार पाहून या चौघांनी संशयितांवर लाठीहल्ला करून त्यांना पकडून लक्ष्मीपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केल्याने जखमी अंकुशचे प्राण वाचले.
टपरीचालकास मारहाण
सीपीआरच्या बाहेर अर्जुन राणे यांची चहाची गाडी आहे. महिलांचा आरडाओरड ऐकून ते धावत सीपीआर आवारात आले. त्यांनी मारहाण करणाऱ्या तरुणांना ‘मारू नका, मरेल तो,’ असे म्हटले. त्यावर संशयितानी त्यांना कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केली.

Web Title: Trying to kill the offender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.