स्वार्थासाठीच माझ्या बदनामीचा प्रयत्न

By Admin | Updated: July 17, 2014 00:15 IST2014-07-17T00:14:00+5:302014-07-17T00:15:12+5:30

रणजित परमार : कायदेशीर लढा देण्याचा इशारा

Trying to defame me for selfishness | स्वार्थासाठीच माझ्या बदनामीचा प्रयत्न

स्वार्थासाठीच माझ्या बदनामीचा प्रयत्न

कोल्हापूर : सराफ संघाचा अध्यक्ष म्हणून एक रुपयाचाही फेरफार केलेला नाही, उलट संघाच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. आज माझ्यावर आरोप करणाऱ्या माजी अध्यक्षांनीच तीन महिन्यांपूर्वी माझ्या अभिनंदनाचा ठराव केला होता. आता मात्र स्वार्थासाठी जातीय तेढ आणि हिशेबाचे कारण पुढे करत मला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र, मी अशा दबावाला भीक घालणार नाही. त्यांनी हे प्रकार थांबवावेत; अन्यथा मी त्यांच्याविरोधात कायदेशीर लढा देईन, असा इशारा सराफ संघाचे अध्यक्ष रणजित परमार यांनी पत्रकार परिषदेत दिला.
संघाचे विद्यमान अध्यक्ष परमार आणि माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून हिशेब आणि अध्यक्षपदाची मुदतवाढ अशा विषयांवरून वादावादी सुरू आहे. या वादाचे पर्यावसान आता आरोप -प्रत्यारोपांत झाले असून आज, बुधवारी परमार यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचा खुलासा केला.
ते म्हणाले, माजी अध्यक्षांनी आपली मुदत संपण्याच्या एक दिवस आधी संघाची २ कोटी रुपये किमतीची जागा फक्त १० लाख रुपये आणि ७ हजार रुपये भाडे एवढ्या अल्प किमतीत सोनाली ड्रेसेसला कायमस्वरूपी दिली. त्यासंबंधीच्या कागदपत्रांचीही पूर्तता केली. या व्यवहाराविरोधात आम्ही न्यायालयात गेलो म्हणून त्यांना माझा राग आला. त्यांना अध्यक्ष होण्याची घाई झाली झाल्याने ही आदळआपट सुरू केली आहे. येत्या २३ तारखेला होणाऱ्या संघाच्या बैठकीत मी कामाचा अहवाल मांडेन. त्यानंतर संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर केली जाईल. सभासद देतील तो निर्णय मी मान्य करेन. यावेळी उपाध्यक्ष संजय कदरे, सचिव सुरेश ओसवाल, रामचंद्र संकपाळ, शिवराज पवार, धर्मपाल जिरगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Trying to defame me for selfishness