काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: November 11, 2014 00:18 IST2014-11-11T00:17:29+5:302014-11-11T00:18:07+5:30

राष्ट्रवादीची रणनीती : महापालिकेत चाचपणी सुरू

Trying to convince the Congress | काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न

काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत बदललेले राजकीय संदर्भ आणि खासदार धनंजय महाडिक व माजी मंत्री सतेज पाटील यांच्यात निर्माण झालेली राजकीय कटुता यातून महापालिकेतील सत्ताकारणात काँग्रेस पक्षाला बाजूला ठेवत सत्तास्थापनेचा नवा सारीपाट राष्ट्रवादीकडून मांडला जात आहे. पुढील महिन्यात होत असलेल्या पदाधिकारी निवडीवेळी काँग्रेसला झटका देण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीने अर्थात खासदार महाडिक यांनी आतापासूनच तयारी सुरू
केली आहे.
महानगरपालिकेतील सत्ता बदलामागे राजकीय सुडाचीच भावना मोठी असणार आहे. गेल्या चार
वर्षांत महापालिकेत सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत ३१ नगरसेवक निवडून आणले. या सर्व प्रक्रियेत पाटील यांनी महाडिक यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळू नये म्हणून प्रयत्न केले होते तसेच त्यांच्या समर्थकांना पदाधिकारी निवडीवेळी डावलले गेले, अशा तक्रारी
होत होत्या. महाडिकांचे समर्थक असलेल्या प्रकाश नाईकनवरे यांच्या पत्नी प्रतिभा नाईकनवरे यांना महापौर करताना सतेज पाटील यांनी आढेवेढे घेतले. परंतु मालोजीराजेंनी आग्रह धरला म्हणून पाटील यांनी त्यास होकार दिला,असाही सूर आता
उमटत आहे.
लोकसभा निवडणुकीत झालेला धनंजय महाडिक यांचा विजय, विधानसभा निवडणुकीत ‘दक्षिण’मधून अमल महाडिक यांनी केलेला सतेज पाटील यांचा पराभव यामुळे महाडिक गटाचे राजकीय वजन आता वाढले आहे. त्यामुळे महाडिक काका-पुतण्यांनी महापालिकेत लक्ष घालण्याचे ठरविले असून सतेज पाटील यांना महापालिका राजकारणातूनही बाजूला करायचे आहे. त्यासाठी त्यांनी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. आपली हुकूमत निर्माण करण्यासाठी महाडिक गटातर्फे सध्या नगरसेवकांची गणती सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

केवळ सतेज पाटील यांना शह देण्यासाठीच...
गेल्या चार वर्षांपासून एकत्र असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी तोडून काँग्रेसला बाजूला करण्यामागे केवळ सतेज पाटील यांना महापालिकेच्या राजकारणातून दूर करणे एवढा एकच हेतू खासदार महाडिक यांचा आहे, तर गेल्या चार वर्षांत नगरसेवकांनाही काही खळबळजनक घडवायला निमित्त मिळाले नव्हते. पाटील यांना शह देण्याच्या निमित्ताने तरी काही पदरात पडतंय का पाहू, अशा विचारात नगरसेवक आहेत. या सगळ्या हालचालीत विद्यमान महापौर तृप्ती माळवी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.


१२ नगरसेवकांची गरज
काँग्रेसला सत्तेच्या बाहेर ठेवायचे झाल्यास नगरसेवकांच्या संख्याबळास महत्त्व येणार आहे. सभागृहातील बहुमताकरिता राष्ट्रवादीला ३९ नगरसेवकांचा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या राष्ट्रवादीकडे २७ नगरसेवक असून, आणखी १२ नगरसेवकांची आवश्यकता आहे. जनसुराज्य आघाडी व भाजप-शिवसेना आघाडी यांच्याकडे प्रत्येकी ९ सदस्य आहेत. दोन्ही मिळून १८ नगरसेवक होतात. परंतु, जनसुराज्य आघाडीत सतेज पाटील यांना मानणारे दोन सदस्य आहेत. त्यामुळे १६ जणच महाडिक यांच्या राजकीय खेळीत सहभागी होण्याची शक्यता आहे.



दिल्ली अभ्यासदौरा
केवळ निमित्त
खासदार महाडिक यांनी महापालिकेतील राष्ट्रवादी,
जनसुराज्य आघाडी, भाजप, शिवसेना यांच्यासह काँग्रेसच्या नगरसेवकांनाही दिल्ली अभ्यासदौऱ्याचे निमंत्रण
दिले आहे. हा दौरा डिसेंबरच्या
पहिल्या आठवड्यात होणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या किमान सहा ते सात नगरसेवकांनी दिल्ली दौऱ्यावर आपण येण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. त्यामध्ये महाडिक यांना मानणाऱ्या नगरसेवकांचा समावेश आहे.

Web Title: Trying to convince the Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.