सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: March 22, 2016 01:14 IST2016-03-22T01:11:03+5:302016-03-22T01:14:43+5:30
शिरढोण येथील शेतकरी : प्रकृती चिंताजनक; परिसरात खळबळ

सावकारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न
कुरुंदवाड : खासगी सावकारीच्या वसुलीच्या तगाद्याला कंटाळून शिरढोण (ता़ शिरोळ) येथील एका शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ प्रकाश रामू कोरे (वय ४५) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत़ या घटनेमुळे खासगी सावकारात खळबळ उडाली असून, ग्रामीण भागातील खासगी सावकारी चव्हाट्यावर आली आहे़
दरम्यान, चार दिवसांपूर्वी प्रकाश कोरे याने खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून कुरुंदवाड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती़ त्यावर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी़ एस़ हाके यांनी सावकार व कोरे यांना बोलावून आपआपसात समझोता करून वाद मिटवावा, असा सबुरीचा सल्ला देऊन प्रसंगी तक्रार दिल्यास सावकारीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता़
तक्रारीनुसार प्रकाश कोरे यांनी टाकवडे येथील एका बड्या खासगी सावकराकडून २०१३ मध्ये तीन लाख रुपये कर्ज स्वरुपात घेतले होते़ अव्वाच्या सव्वा व्याज आकारणी करून रकमेच्या सुरक्षिततेसाठी म्हणून सावकाराने गट नं़१६१३ ची शेती सहा लाख रुपये पोटी करारपत्र लिहून घेतले़ शिवाय सहा लाख रुपये एकरकमी द्या, नाहीतर प्रत्येक महिन्याला व्याज द्या, असे धमकावत व्याजापोटी १ लाख ७५ हजार रुपये आजपर्यंत दिले आहेत़ असे असताना जादा व्याजासहीत नऊ लाख रुपयांची मागणी करून बाहेरच्या गुंडाकरवी जिवे मारण्याची धमकी देत असल्याचे तक्रारी अर्जात कोरे यांनी म्हटले आहे़
चार दिवसांपूर्वी कोरे यांनी कुरुंदवाड पोलिसात सावकाराविरोधात तक्रार केली होती़ यावर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हाके यांनी सावकार व कोरे यांना बोलावून घेवून पैसे किती दिले व घेतले हे दोघांना माहीत असून, आपआपसात समझोता करून वाद मिटवावा अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला होता़
त्यानुसार गेल्या चार दिवसांपासून समाधानकारक तडजोड होत नव्हती़ तसेच कोरे यांचा ऊस तोडला असून, सावकाराने ऊस अडविल्याने चार दिवसांपासून तुटलेला ऊस वाळत आहे़ त्याच संतापातून व सावकाराच्या त्रासाला कंटाळून सकाळी दहाच्या सुमारास घरामध्ये विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ विष प्यायल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला इचलकरंजी इंदिरा मेमोरियल रुग्णालयात दाखल केले़ मात्र विषाची बाधा अधिक झाल्याने डॉक्टरांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले आहे़ या घटनेची रात्री उशिरापर्यंत कुरुंदवाड पोलिसांत नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)