टस्कर हटविण्यासाठी प्रयत्न

By Admin | Updated: March 4, 2015 00:42 IST2015-03-04T00:38:27+5:302015-03-04T00:42:37+5:30

वाकिघोलमध्ये वनकर्मचारी कार्यरत : पिके वाचविण्यासाठी धडपड

Try to delete the tusker | टस्कर हटविण्यासाठी प्रयत्न

टस्कर हटविण्यासाठी प्रयत्न

राधानगरी : राधानगरी अभयारण्याच्या वाकिघोल परिसरात आलेल्या टस्कराने घेतलेल्या एका बळीमुळे येथील नागरिकांबरोबर वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही झोप उडाली आहे. दिवसभर जंगलात दडणारा हत्ती रात्री गावाजवळच्या शेतात घुसतो. तो मानवी वस्तीत येऊ नये म्हणून वन्यजीवचे कर्मचारी पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस गस्त घालत आहेत. शेतकरीही पिके वाचविण्यासाठी धडपडत आहेत.मागील काही वर्षांत येथील गव्यामुळे होणाऱ्या नुकसानीला येथील शेतकरी वैतागले आहेत. उन्हाळभर दररोज रात्री गव्यांना हुसकावण्याचे कामच शेतकऱ्यांना लागले आहे. गव्याच्या हल्ल्यात पाळीव जनावरे तसेच माणसेही जखमी झाली आहेत. काहींना प्राणही गमवावा लागला आहे. बिबट्याने पाळीव जनावरे मारण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. या सर्व त्रासांमुळे शेतकऱ्यांमध्ये वनविभागाबद्दल मुळातच असंतोष आहे. हत्तीच्या आगमनामुळे त्यामध्ये आणखी भर पडली आहे. हत्तीच्या हल्ल्यात बळी पडलेल्या बाळकू आरेकर यांचा मृतदेह ताब्यात घेताना हा असंतोष प्रकट झाला होता. त्याचा उद्रेक होऊ नये यासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी रात्रंदिवस धडपडत आहेत. यापूर्वी सात वर्षांपूर्वी आलेल्या टस्करानेही असाच धुमाकूळ घातला होता. तो थेट हसणे, राधानगरीजवळच्या परिसरात आला होता. त्याचा माग काढण्यासाठी गस्त घालताना एका वनमजुराला प्राणाला मुकावे लागले होते. त्यामुळे गस्तीवरील कर्मचाऱ्यांच्याही जिवाला धोका आहे. तरीही दिवसभर जंगलात असणारा हत्ती रात्री मानवी वस्तीत घुसू नये यासाठी हे कर्मचारी कार्यरत आहेत. येथील कर्मचाऱ्यांबरोबर चांदोली, कोयना येथील कर्मचारीही यासाठी नेमण्यात आले आहेत.
त्यामुळे यासाठी वन्यजीव विभागाने हत्ती हटाव मोहीम हाती घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. सिंधुदुर्गात ही मोहीम यशस्वी झाली आहे; पण हा परिसर अभयारण्यात येतो. त्यामुळे काही कायदेशीर अडचणी असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे. हत्तीला विरोध म्हणून नव्हे, तर माणसांच्या जगण्यासाठी तरी याबाबत वन्यजीव विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

वाकिघोल परिसरात अजूनही मोठ्या प्रमाणात उसाचे पीक उभे आहे. शिवाय केळी, उसाची लावण, खोडवा अशी हिरवे पिके असल्याने हत्तीला ती पर्वणीच आहे. जवळच काळम्मावाडी धरणाचे पाणी असल्याने या परिसरातून हा हत्ती सहजासहजी जाण्याची शक्यता कमी आहे.

Web Title: Try to delete the tusker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.