महापौरपदी तृप्ती माळवी एकच अर्ज
By Admin | Updated: August 5, 2014 00:31 IST2014-08-05T00:24:25+5:302014-08-05T00:31:23+5:30
शुक्रवारी होणार निवडीवर शिक्कामोर्तब

महापौरपदी तृप्ती माळवी एकच अर्ज
कोल्हापूर : दिवसभराच्या नाट्यमय घडामोडीनंतर आज, सोमवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्याअगोदर काही मिनिटे राष्ट्रवादीतर्फे तृप्ती माळवी यांची महापौरपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली. दिवसभरात अर्ज भरण्याच्या मुदतीत माळवी यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने शुक्रवारी (दि.८) होणाऱ्या विशेष महासभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. माळवी यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण केली. महापौर सुनीता राऊत यांनी २८ जुलैला पदाचा राजीनामा दिला. महापौरपदासाठी राष्ट्रवादीतर्फे नगरसेविका शारदा देवणे, वंदना आयरेकर, ज्योत्स्ना पवार-मेढे, तृप्ती माळवी, तर ‘जनसुराज्य’ पक्षाच्या मृदुला पुरेकर अशा पाच महिला उमेदवारांची नावे महापौरपदासाठी नेत्यांसमोर होती. आज सकाळी बारा वाजल्यापासून येथील शासकीय विश्रामगृहावर जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व आमदार के . पी. पाटील, आदीसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्या नगरसेवकांची मतेही जाणून घेतली. नेत्यांनी शेवटपर्यंत नाव गुपित ठेवल्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली होती. सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे गटनेता राजू लाटकर यांनी तृप्ती माळवी यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर माळवी यांनी महापौर सुनीता राऊत, नगरसेवक जयंत पाटील, आदिल फरास, रमेश पोवार, शारंगधर देशमुख, सचिन खेडकर, आदीसह नगरसचिव व साहाय्यक उपायुक्त उमेश रणदिवे यांच्याकडे अर्ज दाखल केला. माळवी यांनी भरलेल्या दोन अर्जांसाठी महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, राजू लाटकर व मुरलीधर जाधव हे सूचक, अनुमोदक होते. (प्रतिनिधी) / छायाचित्र पान ४ वर तृप्ती माळवी यांच्या नावाची घोषणा होताच त्यांच्या कार्यकर्त्यांची एकच जल्लोष करीत एकमेकांना आलिंगन दिले. घोषणा होताच माळवी यांना अश्रू रोखता आले नाहीत. निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, ‘माळवी यांचे सौभाग्य हरविले असले तरी राष्ट्रवादी त्यांना लाल दिव्याची गाडी देऊन सन्मान करेल’, असे आश्वासन दिले होेते. नेत्यांनी हे आश्वासन पूर्ण केल्याची चर्चा नगरसेवकांत होती.