वंचितांची बाजू मांडणाराच सच्चा लेखक : इंगळे

By Admin | Updated: June 22, 2015 00:22 IST2015-06-21T23:51:10+5:302015-06-22T00:22:22+5:30

राजर्षी शाहू व्याख्यानमाला

True Writer Writes: Ingle | वंचितांची बाजू मांडणाराच सच्चा लेखक : इंगळे

वंचितांची बाजू मांडणाराच सच्चा लेखक : इंगळे

कोल्हापूर : प्रत्येक सच्चा लेखक हा व्यवस्थेच्या बाजूने कधीच नसतो. तो नेहमी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन वंचिताची बाजू मांडतो. त्याच्या लेखनाचा आत्मा वंचितांसाठीच असतो. ‘निशाणी डावा अंगठा’मध्ये हाच प्रयत्न केला आहे, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रमेश इंगळे यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना रविवारी बोलत होते. ‘निशाणी डावा अंगठा’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.डॉ. इंगळे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेले त्रासदायक भ्रष्ट अनुभव, व्यक्तीच्या कलावंत म्हणून जगण्याला हादरे देणारी वृत्ती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या प्रौढ साक्षरता अभियानादरम्यान प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर ‘निशाणी डावा अंगठा’ आधारित आहे. रस्त्यावर न उतरता लेखणीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील वाईट प्रवृत्तींवर आसूड ओढण्याचा प्रयत्न यात केलेला आहे.
ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर लिहिणारा लेखक हा आपला माणूस नाही, ही धारणा आजही आहे. शेती हाच ग्रामीण साहित्याचा पैलू म्हणून ओळखला जातो; पण ग्रामीण भागातील शाळा, या शाळांशी संबंधित विविध घटक हा ग्रामीण साहित्याचा भाग असायला हवा, अशी अपेक्षाही डॉ. इंगळे यांनी व्यक्त केली. डॉ. इंगळे म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी लेखकाची लढाई ही कागदावर उतरते. गेंड्याची कातडी असलेल्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर ‘निशाणी डावा अंगठा’मधून आसूड ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न शिक्षण व्यवस्थेतील कारभारावर प्रकाश टाकणारा असला तरी अन्य खात्यातील कारभार असाच असल्याचे दस्तुरखुद्द त्या-त्या विभागांतूनच ऐकायला मिळतो, हे या कादंबरीचे यश आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शिक्षण व्यवस्थेच्या व्यथा डॉ. इंगळे यांनी मांडल्या आहेत. या व्यवस्थेमध्ये काम करतानाही त्यांनी आपले स्वत्व जपत ते लेखनामध्ये उतरवले आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी अशा कादंबरीकारांची आज गरज आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
 

Web Title: True Writer Writes: Ingle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.