ट्रकची ट्रॉलीला धडक; दहा गंभीर
By Admin | Updated: December 22, 2014 00:23 IST2014-12-22T00:23:28+5:302014-12-22T00:23:43+5:30
ऊस भरताना अपघात : आवळी बुद्रुक येथील दुर्घटना

ट्रकची ट्रॉलीला धडक; दहा गंभीर
आमजाई व्हरवडे : रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये शेतातील ऊस भरत असताना भरधाव वेगाने आलेल्या वाळू वाहतुकीच्या ट्रकने ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅक्टरचालकासह नऊ ऊसतोडणी मजूर गंभीर जखमी झाले. हा अपघात आज, रविवारी रात्री आठ वाजता कोल्हापूर-राधानगरी मार्गावर आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे घडला.
अपघातानंतर घटनास्थळाचे दृश्य विदारक होते. रस्त्यावर सर्वत्र ऊस विखुरला होता, तर रक्ताचे थारोळे ठिकठिकाणी दिसत होते. दुर्घटनेनंतर ट्रकचालक विश्वास चौगुले (रा. पंडेवाडी, ता. राधानगरी) हा पळून गेला. जखमींवर कोल्हापुरातील सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत.
या अपघातात साताप्पा बंडोपंत पवार (वय ३६), सुभाष शंकर पाटील (२७), दगडू गणपती कांबळे (२७), सागर शंकर कवडे (३०) , नेताजी गोविंद शिंदे (३४) , शामराव ज्ञानू कवडे (५५) , पांडुरंग दादू परीट (६०), गंगाराम संतू कांबळे (४०), श्रीपती कृष्णा कवडे (६५), सागर चंद्रकांत पाटील (२६, सर्व रा. आवळी बुद्रुक) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल केले.
आवळी बुद्रुक येथे रस्त्याच्या कडेला रामा जोती चौगुले (रा. आवळी बुद्रुक) यांच्या मालकीच्या शेतात ऊसतोडणी सुरू होती. दिवसभर तोडलेला ऊस ट्रॅक्टर-ट्रॉली (एमएच ०९ एएन -४०२८, एमएच ०९ ए -८७९५)मध्ये भरण्याचे काम सुरू होते.
याचवेळी कोल्हापूरहून वाळू भरलेला ट्रक (एमएच ०९-६८०९) भरधाव वेगाने पणोरीकडे निघाला होता. या ट्रकने ऊस भरणी सुरू असलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन रस्त्याच्या कडेला नाल्यात उलटला, तर ट्रॉली रस्त्यावरच उलटली. रस्त्यावर उसाचा खच पडला होता. तसेच ऊस मजूरही रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. अपघातानंतर ट्रकचालक विश्वास चौगुले पळून गेला. तो स्वत:च ट्रकमालक आहे. या दुर्घटनेनंतर मोठा आवाज आल्याने परिसरात गोंधळ उडाला. परिसरातील गावांतील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते. रस्त्यावर अस्ताव्यस्त रक्ताच्या थारोळ्यात जखमी पडले होते. अंधारातून जखमींना शोधून त्यांना तातडीने खासगी वाहनातून उपचारासाठी कोल्हापूरला सीपीआरमध्ये दाखल केले.
या दुर्घटनेत ट्रकच्या पुढील भागाचा चक्काचुरा झाला असून, ट्रॉलीचेही मोठे नुकसान झाले आहे.
जखमींची नावे अशी
नेताजी गोविंद शिंदे (वय ३४), दगडू गणपती कांबळे (२७), सागर चंद्रकांत पाटील (२६), सुभाष शंकर पाटील (२७), श्रीपती कृष्णा कवडे (६५), गंगाराम संतू कांबळे (४०), सागर शंकर कवडे (३०), साताप्पा बंडोपत पवार (३६), शामराव ज्ञानू कवडे (५५), पांडुरंग दादू परीट (६०). (वार्ताहर)
जखमींवर
सीपीआरमध्ये उपचार
आवळी बुद्रुक (ता. राधानगरी) येथे उसाची ट्रॉली उलटल्याने जखमी झालेल्या ऊसतोड कामगारांवर सीपीआर रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना राजारामपुरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच रुग्णांच्या नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली होती.