यड्रावमध्ये ट्रकची समोरासमोर जोरदार धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:56+5:302021-04-28T04:24:56+5:30
यड्राव :येथील सांगली मार्गावर असणाऱ्या बालाजी वेअर हाऊससमोर मद्यधुंद ट्रकचालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोन्ही ...

यड्रावमध्ये ट्रकची समोरासमोर जोरदार धडक
यड्राव :येथील सांगली मार्गावर असणाऱ्या बालाजी वेअर हाऊससमोर मद्यधुंद ट्रकचालकाने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन्ही ट्रकचालक जखमी झाल्याने त्यांना हातकणंगले येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. इचलकरंजी जयसिंगपूर या मुख्य मार्गावरच हा अपघात झाल्याने अपघातानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
सकाळी आठच्या सुमारास जयसिंगपूरकडे भरधाव एम एच ०९ बीए ६६५१ हा ट्रक नामदेव शिवाजी वाईंगडे( रा.आर. के. नगर इचलकरंजी) घेऊन जात असताना त्यांनी समोरून येणाऱ्या एम एच १० झेड १६२९ या ट्रकला जोरदार धडक दिली. हा ट्रक जवाहर साखर कारखान्याकडे साखर भरण्यासाठी चालक यासिन आवटी (रा. सांगली) हा घेऊन जात होता. या धडकेत यासीन आवटी यांच्या पायाला जबर मार बसला आहे तर नामदेव वाईंगडे हे पण जखमी झाले. त्यांनी मद्यपान केले असल्याची चर्चा घटनास्थळी होती. जखमी झालेल्या दोन्ही चालकांना उपचारासाठी हातकणंगले येथील सरकारी दवाखान्यात पोलीस पाटील जगदीश सपकाळ यांच्यासह ग्रामस्थांनी दाखल केले आहे.
या धडकेत दोन्ही ट्रकच्या पुढील भागासह चालक केबिन्सचे मोठे नुकसान झाले आहे. इचलकरंजीकडे जाणारा ट्रक नंबर १६२९ च्या डिझेलची टाकी पूर्णपणे फुटली असल्याने त्याठिकाणी डिझेल सांडले होते. दोन्ही ट्रकचे नुकसान झालेले साहित्य रस्त्यावर पडल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती शहापूर पोलिसांना मिळाल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश खराडे, शशिकांत ढोणे यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावर अडथळा निर्माण करणारा अपघातग्रस्त ट्रक क्रेनने बाजूला करून रस्ता वाहतुकीस खुला केला.
फोटो ओळी: यड्राव येथे ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने ट्रेकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.