नांगनूरचा दूषित पाणीप्रश्नी संघर्ष !
By Admin | Updated: November 27, 2014 00:20 IST2014-11-26T23:37:42+5:302014-11-27T00:20:19+5:30
‘हिरण्यकेशी’त दूषित पाणी : नदीत मळी मिसळल्याने पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर

नांगनूरचा दूषित पाणीप्रश्नी संघर्ष !
राम मगदूम - गडहिंग्लज -गडहिंग्लजच्या पूर्वेकडील नांगनूर गावच्या हद्दीत हिरण्यकेशी नदीच्या पात्रात मळीमिश्रित सांडपाणी मिसळते. त्याच ठिकाणी नळयोजनेचे जॅकवेल असल्यामुळे गावाला दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. पाणी दूषित करणाऱ्या कारखान्यांविरूद्ध कारवाई व्हावी व ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावे म्हणून ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या ७ वर्षांपासून संघर्ष करीत आहेत. मात्र, माय-बाप सरकारला अजून जाग आलेली नाही.
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नांगनूरची लोकवस्ती ३ हजार आहे. गावाला स्वच्छ व शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून ‘जलस्वराज्य’ प्रकल्पांतर्गत ३३ लाखांची नळयोजना राबविण्यात आली आहे. पाणी बचतीसाठी गावातील नळांना मीटरही बसविण्यात आले आहेत.
हिरण्यकेशी नदीच्या तीरावर जॅकवेल बांधण्यात आले आहे. ट्रेंच गॅलरीद्वारे नदीतील पाणी ६० फुटांवरून जॅकवेलमध्ये टाकून गावाला वितरीत केले जाते. याच जॅकवेलच्या परिसरात मळीमिश्रित सांडपाणी नदीच्या पाण्यात मिसळते. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी अद्यापही बोअर आणि खासगी विहिरींचाच आधार घ्यावा लागत आहे. प्रदूषित पाण्यामुळे ही नळयोजना कुचकामी ठरली आहे.
संकेश्वरच्या हिरण्यकेशी साखर कारखान्यातून सोडण्यात येणारे मळीमिश्रित सांडपाणीच नांगनूरनजीक हिरण्यकेशी नदीच्या पाण्यात मिसळते. पाणी प्रदूषित होवून मासे मृत्यूमुखी पडतात. पाण्याला दुर्गंधी सुटते, जनावरेदेखील ते पाणी पित नाहीत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कारखान्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि मळीमिश्रित पाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध करावा, यासाठी ग्रामपंचायतीचा पाठपुरावा सुरू आहे.
पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार
तलाठ्यापासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकरांपासून तत्कालीन केंद्रीयमंत्री शरद पवार व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे.
प्रदूषण मंडळाकडूनही बेदखल
महाराष्ट्र व कर्नाटक प्रदूषण नियंत्रण मंडळासह दिल्लीच्या केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील अर्ज-विनंत्या केल्या. मात्र, याबाबत अजूनही न्याय मिळालेला नाही.