इचलकरंजीत काही वेळ तणाव : दोन गटांत वादावादी
By Admin | Updated: October 16, 2014 00:59 IST2014-10-16T00:54:37+5:302014-10-16T00:59:46+5:30
जिल्ह्यात पोलीस छावणी

इचलकरंजीत काही वेळ तणाव : दोन गटांत वादावादी
इचलकरंजीत काही वेळ तणाव : मतदारांना पैसे वाटल्याचा गैरसमज; पोलिसांचा सौम्य लाठीमारकाँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक
इचलकरंजी : मतदारांना पैसे वाटल्याच्या गैरसमजातून कॉँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकी होण्याचे प्रकार घडले. सरस्वती हायस्कूल या मतदान केंद्राजवळ कॉँग्रेसचे नगरसेवक श्रीरंग खवरे व भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचे बंधू महादेव हाळवणकर परस्परांना भिडल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
सरस्वती हायस्कूलमधील मतदान केंद्राजवळ सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास आॅटो रिक्षातून आणलेल्या मतदारांना पैसे दिल्याचा गैरसमज झाला आणि त्या रिक्षाजवळ कॉँग्रेस व भाजपचे समर्थक जमले. त्यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याने शाब्दिक चकमक उडाली. हा प्रकार सुरू असतानाच कॉँग्रेसचे नगरसेवक श्रीरंग खवरे आले. त्यांनी संतप्तपणे आव्हान देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे आलेल्या महादेव हाळवणकर यांनी पैसे वाटप होत असल्याबद्दल जाब विचारला. यावेळी गर्दीमध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार करीत जमाव पांगविला.
साधारणत: साडेअकरा वाजण्याच्या सुमारास खंजिरे मळा येथे भाजपच्या बुथवर मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक लावल्यावरून कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार केली. यावेळीही दोघांच्या समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली, तर जवाहरनगरमधील नॅशनल हायस्कूलजवळ पैसे वाटपाच्या गैरसमजातून भाजप व कॉँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले. त्यांच्यातही शाब्दिक चकमक उडाली; पण घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविले. (प्रतिनिधी)
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी (दि. १३) संपला; मात्र मतदानाच्या तासभरापूर्वीही सोशल मीडियावरील प्रचार व लढाई सुरूच होती. दिवसभरात उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका, वादाचे प्रसंग, टोलचा मुद्दा, आक्षेपार्ह जाहिराती, वात्रटिका दिवसभर व्हॉटस् अॅपवर फिरत होत्या.
विधानसभा निवडणुकीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर झाला. निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याच्या दिवसापासून फेसबुक व व्हॉटस् अॅपचा प्रचारासाठी वापर सुरू झाला. सोशल मीडियातील ही प्रचाराची धुळवड मतदानाच्या शेवटच्या घटकेपर्यंत सुरू होती. निवडणूक आचारसंहितेप्रमाणे सोमवारीच प्रचाराची सांगता झाली. त्यानंतर खऱ्या अर्थाने उमेदवारांच्या सोशल मीडिया सेल ‘अॅक्टिव्ह’ झाला. समोरच्या उमेदवारावर चिखलफेक करणाऱ्या जाहिरातीबरोबरच स्वत:ची टिमकी वाजविणाऱ्या जाहिराती सोशल मीडियावर फिरू लागल्या.
आज, बुधवारी मतदानाच्या दिवशी सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदानाचा पवित्र हक्क बजावावा, अशी विनंती करणारे मेसेज उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून पाठविण्यात येत होते. त्यानंतर उमेदवारांनी मतदान केल्यानंतर विजयाची खूण करणारे व त्याखाली विशिष्ट स्लोगन असलेले फोटो फॉरवर्ड केले जात होते.
दुपारच्या सत्रात मतदारसंघात मतदानासाठी झालेली गर्दी, मिळणारा प्रतिसादही तत्काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगजाहीर करण्याची घाई सुरू होती. काही ठिकाणी पैसे वाटपावरून, तर काही ठिकाणी मतदान बूथशेजारी असलेल्या मदतकेंद्रांवरून कार्यकर्ते आमने-आमने आले. ‘मतदानासाठी आता अर्धा तास उरला आहे, चला उठा मतदान करा’ अशाप्रकारे शेवटच्या घटकेपर्यंत मतदानाची धुळवड सोशल मीडियावर सुरू होती.
विचारेमाळ, शाहूपुरीत दोन गटांत वादावादी
लक्षतीर्थमध्ये पोलिसांची विशेष दक्षता : अनेक ठिकाणी बंदोबस्तात वाढ
कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान आज, बुधवारी दिवसभरात लक्षतीर्थ वसाहत, विचारेमाळ व शाहूपुरीमध्ये दोन गटांत वादावादीचे प्रकार घडल्याने तणाव पसरला. घटनास्थळी पाच मिनिटांत सशस्त्र पोलिसांची फौज पोहोचताच कार्यकर्ते पसार झाले. शहरात मतदान केंद्रांवर मतदानासाठी सकाळपासून कार्यकर्त्यांसह मतदारांची वर्दळ सुरू होती. कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघांत बहुरंगी लढती असल्याने सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रांच्या बाहेर बूथ मांडले होते.लक्षतीर्थ वसाहत, विचारेमाळ व शाहूपुरी पाचव्या गल्लीमध्ये मतदार स्लिप वाटप करण्यावरून दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्यात वादावादी झाली. दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडणार तेवढ्यात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या घटनेने परिसरात चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
त्यांना पाहून कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. त्यानंतर या परिसरात पोलिसांच्या बंदोबस्तात वाढ करण्यात आली. शहरासह जिल्ह्यातील वातावरणाची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी घेतली. त्यांनी स्वत: काही संवेदनशील मतदारसंघांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात पोलीस छावणी
मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी साडेपाच हजार पोलीस तैनात केले होते. अहमदाबाद, लखनौ, भोपाळ, पश्चिम बंगाल, गुजरात येथील सशस्त्र पोलीस बंदोबस्त पाहून उत्साही कार्यकर्त्यांना धडकी बसली होती. जिल्ह्यांत सर्वच मतदार केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केल्याने सर्वत्र पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.