राजाराम तलावासभोवती जगवली झाडे, मॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:25 IST2021-03-17T04:25:41+5:302021-03-17T04:25:41+5:30
कोल्हापूर : वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून ...

राजाराम तलावासभोवती जगवली झाडे, मॉर्निंग वॉकच्या गटाने केली किमया
कोल्हापूर : वृक्षसंवर्धनाच्या नावाखाली अनेकदा दिखावा केला जातो. मात्र, नियमित फिरण्यासाठी येणाऱ्या विविध समूहातील व्यक्तींनी सातत्याने दोन वर्षांहून अधिक काळ येथील राजाराम तलावाभोवती लावलेल्या रोपांना पाणी घालून जगविले आहे. एकमेकांची ओळखही नसताना केवळ वृक्षसंवर्धनासाठी हा गट आता एक झाला आहे.
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठ, राजाराम तलाव, कृषी कॉलेज परिसरात अनेकजण फिरायला येतात. असे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात कमी नाही; परंतु स्वत:च्या आरोग्यासोबत पर्यावरणाचीही काळजी घ्यावी, असा विचार करणाऱ्यांची संख्याही हाताच्या बोटावर मोजता येईल इतकीच आहे. अशा पर्यावरणप्रेमींमध्ये प्रत्यक्ष कृती करणारा एक गट सध्या कौतुकास पात्र ठरला आहे.
सातत्याने राजाराम तलावावर पोहायला येणाऱ्यांनी पाटबंधारे खात्याच्या दीड किलोमीटर परिसरातील ओसाड जागेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला आणि दोन वर्षांपासून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास प्रारंभ केला. पाच ते सहा जणांपासून आता हा गट सायकलवरून पाच लिटरच्या सुमारे ३० कॅनने रोज सकाळी ६ ते ८ या वेळेत तलावातील पाणी उपसून परिसरात लावलेल्या रोपांना घालण्यास त्यांनी सुरुवात केली. प्रारंभी समीर नरेंद्र मेहता यांनी फिरायला जाताना एकट्याने वाटेवरच्या झाडांना पाणी घालण्यास सुरुवात केली. त्यांना असेच काम करणारे धनंजय वाडकर भेटले. मग विजय शिंदे, दत्ता पवार, सुधाकर कुंभार, मंगेश जनार्दन पाटोळे, विठ्ठल बसप्पा भागोजी आदी पर्यावरणप्रेमी स्वयंस्फूर्तीने त्यांच्या कामात मदत करत गेले. हाताने पाणी उपसण्यासाठी लागणारी मेहनत पाहून फिरायला येणारे आर्किटेक्चर सूरत जाधव यांनी ट्रेडर पंप देणगी म्हणून दिला. या पंपद्वारे आता साडेतीनशे फूट पाइपच्या साहाय्याने २० फूट अंतरापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या झाडांना पाणी देता येऊ लागले.
ही झाडे जगवली
परिसरातील माळावर पूर्वी लावलेली तसेच नव्याने लावलेल्या रोपांना हा गट लाॅकडाऊनच्या आधीपासून सातत्याने पाणी घालत आला आहे. मार्च, एप्रिलमध्ये करंजी, रेनट्री, बहावा, रामफळ, लिंबू अशा जंगली झाडांच्या सुमारे पाचशे ते सहाशे बिया जमा करून येथे सुमारे १००० झाडे लावली आहेत. या गटाने परिसरात येणारी जनावरे खाऊ शकणार नाहीत, अशी करंजीची ९० टक्के रोपे जगवून दोन वर्षांत मोठी केली आहेत.
(फोटो :16032021-Kol-tree rajaram talav)
===Photopath===
160321\16kol_1_16032021_5.jpg~160321\16kol_2_16032021_5.jpg~160321\16kol_3_16032021_5.jpg
===Caption===
16032021-Kol-tree rajaram talav~16032021-Kol-tree rajaram talav1~16032021-Kol-tree rajaram talav2.jpg