चार रुग्णालयांत उपचार कक्ष
By Admin | Updated: February 26, 2015 00:22 IST2015-02-25T00:47:04+5:302015-02-26T00:22:48+5:30
आरोग्य विभाग सतर्क; बारा संशयित रुग्ण बरे

चार रुग्णालयांत उपचार कक्ष
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. पेठवडगाव येथील गर्भवती महिलेचा सोमवारी मृत्यू झाला. बारा संशयित रुग्णांना डिस्चार्ज केले आहे. पाच रुग्णांचा स्वाब तपासणीसाठी पाठविले आहे. त्यामुळे शासनाचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यातील चार शासकीय रुग्णालयांत स्वतंत्र उपचारकक्ष सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. जी. आडसूळकर यांनी मंगळवारी ‘सीपीआर’मध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. आडसूळकर म्हणाले, पुणे, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, नाशिक या भागांत स्वाईन फ्लूची साथ आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काही प्रमाणात रुग्ण आढळत आहेत. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी, अतिसार अशी सर्वसाधारण लक्षणे आहेत. हे लक्षणे दिसताच संबंधितांनी जवळच्या डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे. प्रामुख्याने स्वाईनची लागण झालेला रुग्ण खोकल्यास, शिंकल्यास विषाणूंच्या माध्यमातून होत असते. लागण झाल्यापासून सात दिवसांपर्यंत दुसऱ्याला संसर्ग होत असतो. त्यामुळे स्वाईन फ्लू झालेल्या रुग्णाने इतर व्यक्तींशी जवळीकता टाळावी, शाळा, रस्ते, कार्यालयास जाऊ नये, साबण, अल्कोलबेस हँडवॉश लिक्विडने हात धुवावेत, शिंक, खोकला आल्यास रुमालाचा वापर करावा, वेळेवर उपचार व औषधे घ्यावीत.
फेसमास्क, टॅमी फ्ल्यू औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध केला आहे. परराज्य व परदेशांतून येणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे. ज्या गावांत स्वाईन फ्लूचे रुग्ण मिळत आहेत, तेथे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्यसेविका यांचे जिल्हास्तरीय नियंत्रण पथक त्वरीत दाखल होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग व जिल्ह्णातील ७३ प्राथमिक आरोग्य केंद्रांत आरोग्य शिक्षण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
कक्ष कोठे ?
गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर, कसबा बावडा येथे शासनाच्या रुग्णालयांत स्वतंत्र उपचार कक्ष स्थापन सुरू करण्यात आला आहेत. लक्षणे जाणवलेल्या रुग्णांंनी संबंधित रुग्णालयांत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. आडसूळकर यांनी केले.
पेठवडगावमध्ये संशयित शोधमोहीम
पेठवडगाव : येथील प्राथमिक शिक्षिका प्रमिला पाटील यांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. शहरात यादव कॉलनीतील ३९ कुटुंबांतील सुमारे १४६ नागरिकांचा सर्व्हे केला. तसेच संपूर्ण शहरात प्रबोधन करणारी पत्रके वाटण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत इंदिरा वसाहत, सहारा चौक, गोसावी, डवरी वसाहत ते हजारे कोपरा असा ७०० घरांचा सर्व्हे सुरू होता. यामध्ये कोणीही संशयित रुग्ण मिळून आला नाही. मात्र, पाटील यांच्या शेजारी राहणाऱ्या तिघांना सर्दी झाली आहे. शहरात अन्य कोणाला स्वाईन फ्लूची लक्षणे नसल्याचे सर्व्हेअंती स्पष्ट झाले आहे. नागरिकांनी घाबरू नये, पालिका प्रशासनाने योग्य ती दक्षता घेतली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, आरोग्य अधिकारी नूतन पोरे यांनी दिली. प्रमिला पाटील यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याचे समजताच डॉ. साळी यांनी तळसंदे, वडगाव, लाटवडे येथे परिसराची पाहणी केली.