पाणी अडविण्याच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:00 IST2021-02-05T07:00:53+5:302021-02-05T07:00:53+5:30

सदाशिव मोरे । आजरा आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ ...

Transportation of heavy vehicles across the dam | पाणी अडविण्याच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक

पाणी अडविण्याच्या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक

सदाशिव मोरे । आजरा

आजरा तालुक्यात हिरण्यकेशी व चित्री नदीवर १५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे ५० वर्षांपूर्वी बांधले आहेत. १५ पैकी १२ बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे. बंधाऱ्यांचे बांधकाम कमकुवत झाले असून, प्रतिवर्षी अनेक बंधाऱ्यांचे पिलर कोसळत आहेत. पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या बंधाऱ्यांवरून अवजड वाहनांची धोकादायक सुरू असलेली वाहतूक थांबविण्याची गरज आहे. आजरा तालुक्यात सरासरी १५० मि.मी. पाऊस पडतो. पावसाळ्यात नेहमी हिरण्यकेशी व चित्री नदी धोक्याच्या पातळीबाहेरून वाहत असतात. अतिवृष्टीच्या काळात नदीच्या पाण्याचा वेग जास्त असतो, तर बंधाऱ्यांना मोठ्या ओंडक्यांसह झुडपेही येऊन अडकत असतात. त्यामुळे बंधाऱ्याला धोका निर्माण होतो. अतिवृष्टीच्या काळात आठ-आठ दिवस सर्वच बंधारे पाण्याखाली असतात. बंधाऱ्यांवरून वाळू, वीट, सिमेंट, ऊस, लाकूड यासह अवजड वस्तूंची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बंधाऱ्यांवर पडलेले खड्डेही बुजविले जात नाहीत. हिरण्यकेशी नदीवर पाटबंधारे विभागाने साळगाव, देवर्डे, दाभील, सुळेरान, ऐनापूर, भादवण, हाजगोळी, चांदेवाडी, गजरगाव याठिकाणी, तर चित्री नदीवर परोली येथे बंधारे बांधले आहेत. स्थानिक स्तर जलसंधारण विभागाने किटवडे, शेळप, सोहाळे याठिकाणी बंधारे बांधले आहेत. यापैकी चांदेवाडी, सुळेरान व सोहाळे या बंधाऱ्यावरून फक्त नागरिकांची ये-जा सुरू आहे, तर अन्य सर्व बंधाऱ्यांवरून धोकादायकपणे वाहनांची वाहतूक सुरू आहे.

-

* बंधाऱ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची गरज

बंधाऱ्यावरील अवजड वाहतुकीमुळे पिलर कमकुवत झाले आहेत, तर बंधाऱ्यावर पडलेले खड्डेही भविष्यात धोका निर्माण करू शकतात. ५० वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांचे मजबुती व क्षमता तपासणे, स्ट्रक्चरल आडिट होणे गरजेचे आहे. --------------------------------

* साळगावचा पिलर कोसळला, तर हाजगोळी बंधाऱ्यावर खड्डा

चालू वर्षी साळगाव बंधाऱ्याचा एका पिलरचा भाग कोसळला आहे, तर हाजगोळी बंधाऱ्यावर मधोमध मोठा खड्डा पडला आहे. यामुळे या दोन्हीही बंधाऱ्यांना धोका आहे. पाणी कमी झाल्याशिवाय या दोन्ही बंधाऱ्यांची दुरुस्ती होऊ शकत नाही; पण तत्पूर्वी एखादी दुर्दैवी घटना घडल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. -----------------------------------

* साळगाव बंधाऱ्याशेजारील पर्यायी पुलाचे भिजत घोंगडे

साळगाव बंधाऱ्यावर पावसाळ्यात आठ-आठ दिवस पाणी असते. नागरिकांना सोहाळे मार्गे जावे लागते. बंधाऱ्याशेजारील पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला. भूमिपूजनही झाले; पण बांधकामापूर्वीच आलेला निधीही परत गेल्यामुळे पर्यायी पूल कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. ------------------------------

* फोटो ओळी : हिरण्यकेशी नदीवरील दाभील बंधारा.

क्रमांक : ०१०२२०२१-गड-०३

Web Title: Transportation of heavy vehicles across the dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.