जलवाहिनी स्थलांतराचा प्रस्ताव बारगळला
By Admin | Updated: July 27, 2015 00:28 IST2015-07-27T00:07:01+5:302015-07-27T00:28:41+5:30
जयसिंगपूर रस्ता डांबरीकरण : चार कोटी ८७ लाख रुपयांचा प्रस्ताव, दुपदरी रस्ता सात मीटर डांबरीकरणाचा परिणाम

जलवाहिनी स्थलांतराचा प्रस्ताव बारगळला
जयसिंगपूर : शहरातील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणामुळे जलवाहिनी स्थलांतराचा विषय अखेर बारगळला आहे. शहराला नळपाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन (जलवाहिनी) स्थलांतरीत करण्याचा ४ कोटी ८७ लाख रूपयांचा प्रस्ताव देण्यात आला होता. सात मीटर डांबरीकरणामुळे हा प्रस्ताव अखेर मागे पडला आहे. जयसिंगपूर शहरातून जाणाऱ्या दुपदरी रस्त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईन नगरपालिकेने स्वखर्चाने स्थलांतरीत करून घ्याव्यात, अशा आशयाचे पत्र ठेकेदार सुप्रीम बेस्ट व्हॅल्यू या कंपनीने दिले होते. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला होता.
उदगाव येथून जलशुद्धीकरणाकडे येणारी साडेतीन किलोमीटरची अशुद्ध पाण्याची तसेच सात किलोमीटरच्या पाणी शुद्धीकरण वितरण नलिकेचा खर्च हा पालिकेला आर्थिकदृष्ट्या न पेलवणारा असल्यामुळे व पाईपलाईन स्थलांतरीत करावयाची झाल्यास दीर्घकाळ पाणीपुरवठा खंडित करून ६० हजार लोकसंख्या असलेल्या शहराचा पाणीपुरवठा ठप्प होणार या कारणातून पालिकेने ठराव केला होता.रस्ता रूंदीकरणात पाणीपुरवठा जलवाहिनी ठेकेदार कंपनीने स्वखर्चाने स्थलांतरित करावी अथवा प्रस्तावित अंदाजपत्रकात याबाबत विशेष तरतूद करून हा निधी पालिकेकडे वर्ग करावा, असा निर्णय सभेत घेण्यात आला होता. त्यानुसार आघाडी सरकारकडे पालिकेने पत्रव्यवहार केला होता. दरम्यान, जयसिंगपूर शहरातून जाणारा दुपदरी रस्ता ७ मीटर डांबरीकरण करण्यात आला आहे. यामुळे मुख्य पाईपलाईन बदलण्याचा विषय मागे पडला आहे.
पाईपलाईन बदलावी लागणार नसल्यामुळे पालिकेकडून देण्यात आलेला चार कोटी ८७ लाखांचा प्रस्ताव बारगळला आहे. (प्रतिनिधी)
नगरपालिकेने पाईपलाईन बदलणे गरजेचे
भविष्यात रस्ता रूंदीकरण झाल्यास नगरपालिकेला ही पाईपलाईन बदलणे गरजेचे ठरणार आहे. यामुळे त्यादृष्टीने पुन्हा ठराव करून पालिकेला योग्य नियोजन करावे लागणार आहे, अशी माहिती नगरसेवक अस्लम फरास यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
४चौपदरीकरणांतर्गत मोठ्या रस्त्याचे नियोजन झाले असते तर जलवाहिनी बदलण्याशिवाय पर्याय उरला नसता. पाईपलाईन बदलामुळे शहरातील नळपाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला असता. परिणामी, पाणीपुरवठा काही दिवस ठप्प झाला असता.