महामार्गावरील वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट
By Admin | Updated: May 15, 2015 00:03 IST2015-05-14T22:08:01+5:302015-05-15T00:03:42+5:30
पोलिसांची कमतरता : पुरेशा सुविधांअभावी होतेय धावाधाव

महामार्गावरील वाहतूक पोलिसांची त्रेधातिरपीट
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता पोलीस दलाकडे विविध सोयीसुविधांची वानवा असल्याचे स्पष्ट झाले आहे़ वाहतूक पोलिसांची कमतरता हा त्यातील महत्त्वाचा अडसर असून, पोलिसांची पुरती दमछाक होत असल्याने त्यांचे संख्याबळ वाढवणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गासाठी केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील १७ पोलीस कर्मचारी या अपघातप्रवण क्षेत्रात काम करीत आहेत. वास्तविक हा मार्ग तसा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो. दररोज या मार्गावरून होत असलेली वाहतूक धोकादायक होत आहे.उत्सव आणि विविध सुट्यांच्या काळात या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण आणणे तसे जिकरीचे होत आहे. प्रतिवर्षी या मार्गावर शेकडोंच्या संख्येत बळी जाण्याचे आणि जखमी होण्याचे प्रमाण भयावह आहे. महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामाला हवी तेवढी गती अद्याप प्राप्त झाली नाही. किमान वर्षभर तरी या मार्गावर चौफेर वाहतूक सुरू होण्याची शक्यता नाही़ या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सोडवताना पोलिसांना कसरत करावी लागते. या मार्गावर कशेडी, चिपळूण आणि हातखंबा या ठिकाणी वाहतूकपोलिसांची चेकनाकी आहेत. मात्र, पोलिसांचे संख्याबळ लक्षात घेता महामार्गावरील अपघातप्रसंगी निगराणी करताना मोठी कसरत करावी लागते.
महामार्गावरील हातखंबा हा तसा पोलिसांची जास्त निगराणी असलेला तळ आहे. अगदी संगमेश्वर येथील बावनदीपासून गोव्यापर्यंत पोलिसांना निगराणी करावी लागत आहे. शिवाय रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांना करावे लागते. या ठिकाणी ३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर आहेत. त्यातील केवळ १७ पोलीस कर्मचारी अपघाताच्या वेळी धावाधाव करीत असतात.
हातखंबा परिसरात एकाचवेळी दोन अपघात झाल्यास या भागातील पोलीस अपघातस्थळी वेळेत पोहोचू शकत नाहीत. यामुळे गंभीर रूग्ण दगावण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पोलिसांच्या व्हॅनला एकच चालक असल्याने फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते. त्यांची धावाधाव होते. येथील वाहतूक पोलिसांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्यास महामार्गावरील अपघात रोखणे तसेच विनाविलंब सेवा पुरविणे शक्य होणार आहे.
तसेच एका अतिरिक्त वाहनांची उपलब्धता करून देणे अनिवार्य झाले आहे. महामार्गावरील वाहतूक पोलिसांची ही त्रेधातिरपीट लक्षात घेत शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील १६१ किमी लांबीच्या महामार्गावर केवळ ३६ पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर.
रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावर ७६ किमी अंतरात नियंत्रण ठेवण्याचे काम याच पोलिसांकडे.
३६ पोलीस कर्मचारी पदे मंजूर.
केवळ १७ पोलीस कर्मचारी करतात धावाधाव.