वाहतूक पोलिसास मद्यधुंद तरुणाकडून मारहाण
By Admin | Updated: July 11, 2017 00:56 IST2017-07-11T00:56:11+5:302017-07-11T00:56:11+5:30
वाहतूक पोलिसास मद्यधुंद तरुणाकडून मारहाण

वाहतूक पोलिसास मद्यधुंद तरुणाकडून मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तिब्बल सीट मोपेड अडविल्याच्या रागातून मद्यधुंद तरुणाने वाहतूक पोलिसास शिवीगाळ व धक्काबुक्की करीत मारहाण केली. सोमवारी रात्री साडेसातच्या सुमारास लिशा हॉटेल चौकातील प्रकाराने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. शाहूपुरी पोलिसांनी मद्यधुंद तरुणास अटक केली. संशयित रमेश आनंदा चांदणे (वय ३०, रा. कपूर वसाहत, कदमवाडी) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शहर वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन मधुकर हांगे (३०) हे सोमवारी सायंकाळी लिशा हॉटेल चौकात वाहतूक नियंत्रण करीत होते. यावेळी मार्केट यार्डकडून मोपेडवरून तिघे तरुण आले. त्यांची मोपेड अडवून वाहन परवान्याची चौकशी केली. परवाना नसल्याने तिब्बल सीट आल्याने दंड भरण्यास सांगितले. त्यावर चांदणे व त्याचे साथीदार जबरदस्तीने मोपेडवरून निघाले. त्यांना रोखले असता चांदणे याने वाहतूक पोलीस हांगे यांची कॉलर पकडून शिवीगाळ व धक्काबुक्की करत मारहाण केली. भर चौकात हा प्रकार घडल्याने वाहनधारकांची गर्दी होऊन वाहतूक काही काळ ठप्प झाली. वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत असलेल्या तिघा तरुणांना नागरिकांनी रोखून धरले. यावेळी चांदणे हा सापडला, तर त्याचे दोन साथीदार पळून गेले.
यापूर्वी ताराराणी चौकात इचलकरंजी गावभाग पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल स्वप्निल कांबळे यांना मद्य प्राशन करून नितीन शामराव पाटील (वय ३७, रा. कदमवाडी) याने मारहाण केली होती. उमा टॉकीज सिग्नल चौकात रेड सिग्नल पडल्यानंतर थांबण्याचा इशारा केल्याचा राग मनात धरून दोघा मद्यपी तरुणांनी वाहतूक शाखेच्या सहायक फौजदार जानबा शंकर देसाई (५७) यांना शिवीगाळ करीत बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी साईदास संजय शिंदे (वय २७, रा. टेंबे रोड, शिवाजी स्टेडियम), प्रीतम सतीश शिंदे (३०, रा. रविवार पेठ) यांना अटक केली होती. गेल्या सहा महिन्यांत वाहतूक शाखेच्या पोलिसाला मारहाण झाल्याची ही चौथी घटना आहे.
खाकीचा प्रसाद
रमेश चांदणे हा सेंट्रिंग कामगार आहे. भर चौकात पोलिसावर हात उगारुन तो नागरिकांच्यावर दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखविताच त्याची दारूच उतरली. हात जोडून तो पोलिसांना कारवाई करू नका म्हणून विनंती करीत होता.