राजारामपुरीत ‘ट्रॅफिक’चा फलक हटविला

By Admin | Updated: April 6, 2015 01:13 IST2015-04-06T01:11:00+5:302015-04-06T01:13:48+5:30

कृती समिती आक्रमक : ९ नंबर शाळेचे पटांगण शहर वाहतूकच्या कार्यालयास न देण्यावर ठाम; आजचा कार्यक्रम उधळणार

Traffic pane has been deleted in Rajarampur | राजारामपुरीत ‘ट्रॅफिक’चा फलक हटविला

राजारामपुरीत ‘ट्रॅफिक’चा फलक हटविला

कोल्हापूर : राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथे शहर वाहतूक शाखेचे कार्यालय स्थलांतरास शाळा व मैदान बचाव कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी विरोधाचा जोर वाढविला असून रविवारी सकाळी शाळेच्या इमारतीवर ‘शहर पोलीस वाहतूक शाखा’ असा लावलेला फलक कार्यकर्त्यांनी हटविला. यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज, सोमवारी सकाळी कार्यालयाचा नियोजित उद्घाटन समारंभ हाणून पाडण्याचा निर्धार कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.
शाळा क्रमांक ९ ही गेली काही वर्षे बंद आहे. शाळेच्या दहा खोल्या व मोठे मैदान पडूनच आहे. त्याचा वापर परिसरातील दुकाने व व्यावसायिकांकडून पार्किंगसाठी केला जातो. मैदानाचीही मोठी पडझड झाली आहे. शाळेच्या तीन खोल्या ‘ट्रॅफिक पोलीस’ वापरणार आहेत. पडझड झालेल्या खोल्यांची पोलीस प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्ती केली आहे. शनिवारी सायंकाळी शाळेचे नाव असलेल्या जागी शहर वाहतूक शाखेचा फलक लावला. तो फलक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी खोडून काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. आंदोलनात नगरसेवक मुरलीधर जाधव, वसंत कोगेकर, बाबा इंदुलकर, कमलाकर जगदाळे, दुर्गेश लिंग्रस, आदी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले.
जयंती नाल्यातून पंचगंगेत मिसळणारे पाणी रोखण्यासाठी जयंती पुलावर ४५० अश्वशक्तीच्या पाणी उपसा केंद्राची उभारणी केली जाणार आहे. या उपसा केंद्रातून पाणी कसबा बावडा येथील प्रक्रिया केंद्रात नेण्यात येणार आहे. जयंती नाल्यावर विजेची उपकरणे, जनरेटर मीटर रूम, पॅनल रूम, ११ के.व्ही. क्षमतेच्या उच्चदाब विद्युत सबस्टेशनची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या जयंती नाल्याशेजारी असणारी सर्व जागा महापालिक ा वापरात आणणार आहे. त्यामुळे महापालिकेने ‘ट्रॅफिक’साठी राजारामपुरीतील शाळा क्रमांक ९ येथील जागा प्रस्तावित केली आहे. नागरिकांच्या विरोधामुळे वाहतूक शाखेचे कार्यालय हलविण्यास विलंब झाल्यास एसटीपी केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यास तितकाच कालावधी पुढे जाणार असल्याचे महापालिका सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
 

Web Title: Traffic pane has been deleted in Rajarampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.