सतीश पाटीलशिरोली : पंचगंगा नदीवरील पुलाकडे कुणाचं लक्ष नाही. पुलावरील रस्त्याची दुरवस्था गंभीर झाली असून, पुलावर खड्डे पडले आहेत आणि उघड्या झालेल्या लोखंडी पट्ट्या उचकटून बाहेर आल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे, तसेच वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.कोल्हापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वारांपैकी एक असलेल्या पंचगंगा नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पुलावर मोठमोठे खड्डे असून, काही ठिकाणी जुन्या काँक्रीटखालील वापरलेल्या लोखंडी पट्ट्या उचकटून उघड्या पडलेल्या आहेत. या कारणांमुळे वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे.पुलावर दररोज हजारो वाहने कोल्हापूर शहराकडे आणि पुण्याच्या दिशेने येतात आणि जातात. दिवसभर या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावते आणि त्यामुळे लांबच लांब वाहनांच्या रांगा तयार होतात. यामुळे वेळ वाया जातो, इंधनखर्च वाढतो आणि नागरिकांचे मानसिक त्रासही वाढतात.विशेष म्हणजे, या पुलाची अवस्था इतकी खराब असूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही तातडीची उपाययोजना करण्यात आलेली नाही. उघड्या लोखंडी पट्ट्यांवरून वाहने जात असल्यामुळे टायर फटना, गाडी घसरून अपघात होण्याचा धोका कायम आहे. तातडीने दुरुस्ती न केल्यास भविष्यात एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांची दुर्लक्षपंचगंगा पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आणि उघड्या झालेल्या लोखंडी पट्ट्यांमुळे वाहनचालकांचे हाल सुरू आहेत. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदारांकडून पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. अपघात होईपर्यंत यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत.
तावडे हॉटेलकडून शिरोलीकडे जाणाऱ्या पंचगंगा नदीवरील पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलाच्या पिलर जॉइंटच्या जागेवरील लोखंडी अँगल उघडे पडले आहेत. खड्डे इतके खोल आहेत की, दुचाकी आणि रिक्षा यांसारख्या वाहनांच्या चाके अडकतात.- नितीन वंदुरे-पाटील, वाहनचालक, शिरोली