बावड्यात रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:58 IST2020-12-05T04:58:48+5:302020-12-05T04:58:48+5:30
कसबा बावडा : कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या ...

बावड्यात रात्रीच्यावेळी वाहतूक कोंडी
कसबा बावडा :
कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा-शिये या रस्त्याची ओळख आहे. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची वर्दळ कायम असते. सायंकाळच्या वेळी मात्र या रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी वाहनचालकांबरोबरच बावडेकरांसाठीही डोकेदुखी ठरत आहे. बावड्याच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण, अस्ताव्यस्त पार्किंग, पाण्याचा हौद चौकात बसलेले विक्रेते, उसाची वाहने, तसेच सायंकाळच्या वेळी औद्योगिक वसाहतीतील नोकरदारांची सततची ये-जा यामुळे दररोज सायंकाळी बावड्यातील मुख्य रस्त्यावरून प्रवास करणे सर्वांसाठीचेच जिकिरीचे बनले आहे. डंपर, केएमटी बसेस आणि राष्ट्रीय मार्गावरून येणारी प्रवासी वाहने यामुळे या वाहतूक कोंडीत भरच पडत आहे. त्यामुळे बावड्याच्या रिंगरोडचा प्रश्न कधी सुटणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या वाहतुकीच्या कोंडीमुळे सध्या बावड्यात आठवड्यातून एखादा-दुसरा किरकोळ अपघात नित्याचाच झाला आहे. आपापसात तडजोड करून ही अपघाताची प्रकरणे मिटविली जात आहेत. बावड्याचा भगवा चौक ते पिंजार गल्ली कॉर्नरपर्यंतच्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते, तर पाण्याचा हौद चौक व पाटील गल्लीच्या छत्रपती शिवाजीराजे चौकात वाहतुकीची कोंडी ठरलेली आहे. पाण्याच्या हौद चौकात फळ विक्रेते, फुले विक्रेते व भाजीपाला विक्रेते रस्त्यालगतच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. सणासुदीच्या काळात तर या चौकातून मार्ग काढणे एक दिव्य असते.
अतिक्रमण पथक गेले कुठे...
दिवसभर शहरभर रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर कारवाई करून गाजावाजा करणारे मनपाचे अतिक्रमण पथक बावड्यातील रस्त्यालगत अतिक्रमणांवर कधी कारवाई करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिकांनी, तसेच विक्रेत्यांनी स्वयंशिस्त लावली तरच येथील वाहतूककोंडीला आळा बसू शकतो. पाटील गल्लीच्या पूर्वेकडील रस्त्यावरून उसाने भरलेल्या बैलगाड्या जेव्हा मुख्य रस्त्यावर वळसा घेऊन कारखान्याकडे मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा काही वाहनधारक समोरून बैलगाडी येत असल्याचे पाहूनही आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे बैलगाडीला अपघात होण्याच्या घटना घडत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातामुळेही वाहतूक कोंडीची समस्या नित्याची बनली आहे.
चौकट :
भाजीमंडईचा वापर करा....
बावड्याच्या पाण्याचा हौद चौकात जे फळविक्रेते, फुले विक्रेते, भाजी विक्रेते बसतात त्यांनी दररोज भाजी मार्केट येथे बसण्यास सुरुवात केल्यास वाहतुकीची कोंडी निम्म्याने कमी होईल. यासाठी स्थानिक नगरसेवक व महापालिका अतिक्रमण विभागाने सातत्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
फोटो: ०४ बावडा वाहतूक कोंडी
उसाने भरलेल्या बैलगाड्यांना वाहनचालक वाट न देता आपली वाहने दामटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते.
(फोटो : रमेश पाटील, कसबा बावडा)