अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प
By Admin | Updated: June 8, 2014 01:12 IST2014-06-08T01:11:19+5:302014-06-08T01:12:57+5:30
तिघे जखमी : सांगली फाटा येथे ट्रक-कार अपघात

अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प
शिरोली : पुणे-बंगळूर महामार्गावर शिरोली-सांगली फाटा येथे मालवाहतूक ट्रक आणि इंडिका कार यांची धडक होऊन विश्वजित बंडोपंत वाडकर, प्रताप बाळासो जाधव, दिग्विजय धोंडिराम चौगुले (सर्व रा. सोन्याची शिरोली, ता. राधानगरी) हे तिघेजण जखमी झाले. अपघात मध्यरात्री अडीच वाजता झाला. यामुळे सुमारे आठ तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
कोल्हापूर-सांगली मार्गावर जैन मंदिराच्या समोर ट्रक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूकही सुमारे दोन तास विस्कळीत झाली होती. या मार्गावर हेर्लेपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. या दोन्ही अपघातांमुळे शिरोली-सांगली फाटा पूर्णपणे ठप्प झाला होता.
याबाबत अधिक माहिती अशी, विश्वजित वाडकर, प्रताप जाधव, दिग्विजय चौगले आणि प्रकाश राऊत हे सोन्याची शिरोलीतील चौघेजण इंडिका कारमधून रायगडला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेले होते. ते रात्री दोनच्या सुमारास कोल्हापुरात आले. त्यांना गाडीत डिझेल भरावयाचे होते; पण कोल्हापुरातील सर्व पेट्रोल पंप बंद होते, म्हणून ते शिरोली-सांगली फाटा येथे डिझेल भरण्यासाठी आले असता बंगलोरहून पुण्याकडे मिरची घेऊन जाणारा मालवाहतूक ट्रक व इंडिका कार यांची सांगली फाटा उड्डाणपुलाखाली मध्यरात्री अडीच वाजता जोराची धडक झाली. यात विश्वजित, प्रताप व दिग्विजय हे जखमी झाले आहेत.दोन्ही वाहने महामार्गावरच अडकल्याने कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत होत गेली. पहाटे पाचनंतर महार्गावरील वाहतूक वाढल्याने सांगली फाटा ठप्प झाला. तसेच कोल्हापूर-सांगली मार्गावर शिरोली जैन मंदिर येथे सकाळी दहा वाजता एक ट्रक रस्त्यातच बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूकही दोन तास विस्कळीत झाली. त्यामुळे सांगली-कोल्हापूर व कोल्हापूर-पुणे मार्गावरील वाहतूक दुपारी बारा वाजता सुरळीत झाली.