गडहिंग्लज विभागातील वाहतूक विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:17 IST2021-06-18T04:17:31+5:302021-06-18T04:17:31+5:30
गडहिंग्लज : दुसऱ्या दिवशीही धुवाधार पावसामुळे गडहिंग्लज विभागातील भडगाव, गजरगाव, कोवाड पुलासह हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे ...

गडहिंग्लज विभागातील वाहतूक विस्कळीत
गडहिंग्लज : दुसऱ्या दिवशीही धुवाधार पावसामुळे गडहिंग्लज विभागातील भडगाव, गजरगाव, कोवाड पुलासह हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीवरील भडगाव पूल पाण्याखाली गेल्याने गडहिंग्लज-चंदगडचा संपर्क तुटला आहे. ऐनापूर, इंचनाळ, जरळी, निलजी, नांगनूर व गोटूर हे बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. घटप्रभा नदीवरील हडलगेनजीकचा जुना पूल आणि ताम्रपर्णीवरील कोवाडचा जुना पूल पाण्याखाली गेला आहे. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या पर्यायी पुलावरून वाहतूक सुरू आहे.
साळगाव बंधारा पाण्याखाली
पेरणोली : आजरा तालुक्यातील साळगाव बंधारा पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प आहे. या मार्गावरील वाहतूक सोहाळे मार्गे सुरू आहे.
बसर्गे ओढ्यावर पाणी
हलकर्णी : बसर्गेनजीकच्या ओढ्यावर पाणी आल्याने बसर्गे-हलकर्णी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती.
----------------------
* उत्तूर पसिरात दोन घरांची पडझड
उत्तूर : चिमणे येथील हौशाबाई तुकाराम हुंचाळे यांच्या घराची भिंत कोसळून ५ हजारांचे तर, पेंढारवाडीत शेवंता चंद्रकांत लोखंडे यांच्या घराची भिंती कोसळून २० हजारांचे नुकसान झाले आहे.
गडहिंग्लज पूर्वभागाचा संपर्क तुटला
संकेश्वर : गोटूर बंधारा पाण्याखाली गेल्याने गडहिंग्लजच्या पूर्वभागातील नांगनूर, अरळगुंडी, कडलगे, खणदाळचा या गावांचा संकेश्वरशी संपर्क तुटला आहे. संकेश्वरच्या शंकरलिंग मठ परिसरात पुराचे पाणी आले आहे.
गडहिंग्लज-चंदगडचा संपर्क तुटला
गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर पाणी आल्यामुळे गुरुवारी (दि.१७) दिवसभर गडहिंग्लजचा चंदगडशी संपर्क तुटला होता. त्यामुळे आजरा-इब्राहिमपूर मार्गे चंदगड या मार्गे वाहतूक सुरू होती. हमीदवाडा कारखान्यानजीकच्या बस्तवडे येथील मोरीवर पाणी आल्यामुळे कापशी-गोरंबे मार्गे सुरू असणाऱ्या गडहिंग्लज-कोल्हापूर बसफेऱ्या कापशी-मुरगूड मार्गे सुरू होत्या.
फोटो ओळी : गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील हिरण्यकेशीला पूर आल्याने भडगाव पुलावरील वाहतूक बंद झाली आहे. दुसऱ्या छायाचित्रात गडहिंग्लज नदीवेस परिसरात हिरण्यकेशीच्या पुराचे घुसलेले पाणी. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : १७०६२०२१-गड-०२/०३