दूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता...!

By Admin | Updated: May 23, 2015 00:32 IST2015-05-22T22:30:38+5:302015-05-23T00:32:58+5:30

शासनाचा निर्णय : जिल्ह्यातील ७०९ विद्यार्थी पात्र

Traffic allowance to distant students ...! | दूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता...!

दूरच्या विद्यार्थ्यांना मिळणार वाहतूक भत्ता...!

असुर्डे : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार ग्रामीण भागातील वस्त्यांमध्ये ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणाकरिता १ किलोमीटर परिसरात प्राथमिक शाळा व ३ किलोमीटर परिसरात उच्च प्राथमिक शाळा असाव्यात, असा निकष आहे़ मात्र, अनेक ठिकाणी विद्यार्थी हे शाळेपासून दूर राहात असल्याने अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून वाहतूक भत्ता दिला जाणार आहे. या योजनेत माध्यमिक विभागाकरिता जिल्ह्यातील ७०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
शासनाला नवीन शाळा सुरु करण्याच्या निकषानुसार, शाळा उपलब्ध करुन देता येत नसतील, तर अशा शाळा नसलेल्या वस्तीतील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक सुविधा पुरविण्याची तरतूद आहे. मात्र, अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना मोठी पायपीट करून शाळेत यावे जावे लागत आहे. काहींना एस. टी.चे तिकीट काढण्यापुरतेही पैसे मिळत नसल्याने त्यांना अडचण येत आहे.
ही सुविधा पुरविण्यासाठी सन २०१५ - १६च्या अंदाजपत्रकातील माहितीनुसार, राज्यात ग्रामीण भागातील २२१६ शाळाविरहीत वस्त्यांमधील १४ हजार ८७ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या मुलांना त्यांच्या नजीकच्या नियमित प्राथमिक शाळेत जाण्या-येण्यासाठी एस्. टी.ची सोय अथवा मासिक पासची सोय ज्याठिकाणी उपलब्ध नसेल तेथे अधिकृत खासगी वाहनांची सुविधा पुरविण्यासाठी केंद्र शासनाकडून मंजुरीच्या अधीन राहून वाहतुकीकरिता अनुदान जाहीर केले आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्रत्येक महिन्याकरिता तीनशे व दहा महिन्यांकरिता रुपये तीन हजारच्या मर्यादेत होणाऱ्या खर्चाला शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. मात्र, ज्या मुला-मुलींना शासनाच्या अन्य योजनेखाली मोफत सायकल पुरविण्यात आली आहे, त्यांना ही सुविधा लागू नसेल.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शाळेसाठी कोणीही विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसून, माध्यमिक करीता ७०९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Traffic allowance to distant students ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.