अर्जुनवाडामध्ये ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा
By Admin | Updated: September 21, 2015 23:44 IST2015-09-21T22:40:02+5:302015-09-21T23:44:32+5:30
६७ वर्षांपासून उपक्रम : गणराया अवॉर्ड स्पर्धेतही राधानगरी तालुक्यात द्वितीय क्रमांक

अर्जुनवाडामध्ये ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा
व्ही. जे. साबळे --तुरंबे --सध्या गणेशोत्सवाचा माहोल आहे. गावोगावी, गल्लीगल्लीत अनेकजण एकत्र येऊन तरुण मंडळ स्थापन केले जाते. त्यातून दरवर्षी गणपती बसवण्याची प्रथा सुरू होते. शिवाय स्पर्धा, चढाओढ सुरू होतेच. यामध्ये सामाजिक सेवावृत्तीतून अनेक उपक्रम राबवणारेही आहेत. या सर्व गोष्टींना फाटा देत अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा याही वर्षी मोठ्या उत्साहात सुरू आहे. ६७ वर्षांची ही परंपरा धामधुमीच्या गतिमान युगामध्ये गावातील तरुण वर्गाने अखंडपणे जोपासली आहे. उद्देश, एकत्र गावाला एकोपा राहावा.राधानगरी तालुक्यातील पूर्व बाजूला दूधगंगा नदीतिरावर वसलेले अर्जुनवाडा गाव. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली गावातील तरुण मल्लांना ही कल्पना सूचली. हनुमान तालीम मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. दादा कृष्णा यादव यांनी गावातील लोकांमध्ये एकोपा राहावा, गावात शांतता राहावी, या
उद्देशाने आपल्या गावच्या मुख्य चौकात एकत्र गणपती बसवण्याची विनंती केली. या उपक्रमास नामवंत मल्ल पै. भाऊसो यादव, बापू रामजी पाटील, बळीराम तिकोडे, दत्तू वागरे, दादा हणमंत चौगले, पै. महिपती यादव, श्रीपती म्हाकवेकर, महान भारत केसरी दादू चौगले, शंकर बाले, सखाराम यादव, बचाराम पाटील यांनी दुजोरा दिला. १९४८ पासून गेली ६७ वर्षे या परंपरेला गावाने जपले आहे. ‘एक गाव एक गणपती’ परंपरा सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली त्यावेळेपासून सुरू आहे. सध्या पै. सचिन पाटील, पै. भाऊसो पाटील आपल्या सहकारी मल्लांच्या माध्यमातून ही परंपरा चालवत आहेत. यावर्षीच्या गणराया अवॉर्ड स्पर्धेत अर्जुनवाडा गावाने तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकासाठी आमची यावर्षी तयारी सुरू असल्याचे विद्यमान पदाधिकारी यांनी सांगितले. दरवर्षी गणपती मूर्तीची उंचीही तीन फूट असते. ही मूर्ती पैलवान रूपात असते. गणरायाचे आगमन व विसर्जन पारंपरिक चालीरितीतच होते.यावर्षी शाळकरी मुलींच्या लेझीम पथकाद्वारे गणेश विसर्जन करण्यात येणार आहे. नामवंत मल्ल घडवणाऱ्या हनुमान तालीम मंडळाची ही परंपरा कायम राखत पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यात मंडळ आग्रही असते. (वार्ताहर)