ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !
By Admin | Updated: November 28, 2014 23:43 IST2014-11-28T23:11:38+5:302014-11-28T23:43:02+5:30
प्रशिक्षित चालकांची गरज : वाहतूक नियमांची अंमलबजावणी अपघातास आळा घालेल

ट्रॅक्टर-ट्रॉलीतील ऊस वाहतूक बनतेय जीवघेणी !
घन:शाम कुंभार -यड्राव साखर कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीस प्राधान्य असते; परंतु चालकांचा अतिआत्मविश्वास व अल्लडपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचा अपघातात बळी जात असून, अपघाताच्या घटना सुरू आहेत. हे रोखण्यासाठी साखर कारखान्यांसह ट्रॅक्टरमालकांनी निर्बंध घालणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्ते वाहतूक नियंत्रण विभागाकडून होणारी वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणीच अपघातास आळा घालेल, अन्यथा ‘साखरनिर्मितीचा हंगाम अपघाताचा सिझन’ असे ब्रीदवाक्य होईल. याची दक्षता घेणे सर्वांच्या हिताचे आहे.
साखर कारखान्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीचा एकाच वेळी जादा वापर केला जातो; परंतु यावरील चालक अप्रशिक्षित व वाहतूक नियमाबाबत अनभिज्ञ व व्यसनी असतात. यामुळे इतरांपेक्षा जादा ऊस वाहतुकीची ईर्षा असल्याने वाहनाची क्षमता व अधिकृत परवानापेक्षा जादा ऊस भरल्याने वेग मर्यादा पाळताना चुका होतात. त्याचा परिणाम अपघात होऊन नागरिकांचा हकनाक बळी जात आहे.
वाहनचालकांचे एकाच फेरीत जादा ऊस वाहतूक करण्याच्या प्रयत्नात शेतामध्ये ट्रॉली अडकून पडते. शेतात अडकलेली ट्रॉली बाहेर काढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर किंवा क्रेनचा वापर करावा लागत असल्याने त्याच्या भाड्याचा भुर्दंड शेतकऱ्यांस सोसावा लागतो. त्याचबरोबर अशा प्रकारात वाहनांची मोडतोड झाल्यास त्याचा भुर्दंड वाहनमालकास बसतो. एकूणच चालकाकडे नसलेला पोक्तपणा व अतिआत्मविश्वास इतरांना नुकसानकारक ठरत आहे.
रस्ते वाहतूक नियंत्रण विभागही याकडे लक्ष देत नसल्याने ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या अपघातातील बळींची संख्या वाढत आहे. फक्त वाहतूक सुरक्षा सप्ताहात वाहतूक विभागाकडून एखाद्या-दुसऱ्या वाहनास रिप्लेक्टर लावून सप्ताह साजरा करण्यापुरताच हा विभाग असल्याचा भास होतो.
ट्रॉलीमध्ये परवाना क्षमतेपेक्षा जादा ऊस भरू नये, ट्रॅक्टरवर मोठ्याने रेडिओ अथवा गाणी लावू नयेत, वाहनचालक समजदार व प्रशिक्षित असावा, वाहनांच्या मागे रिफ्लेटर असावा, चालक निर्व्यसनी असावा, ट्रॉलीस ब्रेकची सुविधा असावी, याकरिता ट्रॅक्टरमालकासह साखर कारखान्यांनी विशेष लक्ष देणे सामाजिक हिताचे आहे. वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त करावे, यामुळेच अपघाताचे प्रमाण घटणार आहे, नाही तर गोड साखर निर्माण करणारा हंगाम ‘अपघाताचा व नुकसानीचा’ असा ठपका या हंगामावर येऊ नये याची दक्षता घेणे समाजहिताचे आहे.