नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: June 6, 2015 00:24 IST2015-06-06T00:01:36+5:302015-06-06T00:24:21+5:30
इचलकरंजी नगरपरिषद : नागरी सुविधांसाठी महिला आक्रमक

नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
इचलकरंजी : येथील दत्तनगरमध्ये नागरी सुविधा मिळण्यासाठी शुक्रवारी महिला आंदोलनकर्त्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार व माजी आमदार अशोकराव जांभळे यांना घेराव घातला. साधारणत: पुढील आठवड्यामध्ये सुविधा पुरविण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन संपले.
दत्तनगरमधील सातव्या गल्लीत रस्ते व गटारींची सोय व्हावी, यासाठी वारंवार प्रयत्न करूनसुद्धा नगरपालिकेकडून फक्त आश्वासने दिली जातात. तरी या नागरी सुविधा ताबडतोब मिळाव्यात, या मागणीसाठी बहुजन दलित संघाच्यावतीने सुरेखा काटकर, सागर लाखे, रावसाहेब निर्मळे, आदींच्या नेतृत्वाखाली त्या परिसरातील नागरिकांनी मोर्चा काढला. मोर्चातील महिलांनी नगराध्यक्षा बिरंजे, अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांना घेराव घालून त्यांना प्रश्न विचारून भंडावून सोडले. याचवेळी बांधकाम सभापती भाऊसाहेब आवळे व माजी आमदार जांभळे तिथे आले. त्यांच्यासमोरही आंदोलनकर्त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले.
यावेळी आरोग्य सभापती सुजाता भोंगाळे, नगरसेविका रेखा रजपुते, आदी उपस्थित होते. आंदोलनामध्ये नूरजहॉँ घुणकी, वसुधा भोरे, राधिका लोले, नूरजहॉँ बेपारी, तौफिक इनामदार, राजू मुरसाळगी, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)