कोल्हापूरच्या पर्यटकांची आंबोलीत हुल्लडबाजी; अकराजण ताब्यात
By Admin | Updated: August 3, 2015 00:48 IST2015-08-03T00:48:22+5:302015-08-03T00:48:22+5:30
आंबोली येथे आज वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांमध्ये गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांचा भरणा जास्त होता.

कोल्हापूरच्या पर्यटकांची आंबोलीत हुल्लडबाजी; अकराजण ताब्यात
सावंतवाडी : आंबोलीत पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या अकरा पर्यटकांना पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतले. हे सर्व पर्यटक कोल्हापूर जिल्ह्यातील असून, उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. मात्र, कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनी सांगितले. हा प्रकार रविवारी सायंकाळी घडला.
आंबोली येथे आज वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने हजारो पर्यटक आले होते. या पर्यटकांमध्ये गोवा, कर्नाटक तसेच कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील पर्यटकांचा भरणा जास्त होता. पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी पोलिसांनी मुख्य धबधब्यावरून पर्यटकांना खाली येण्यास सांगितले. त्यावेळी काही पर्यटक मद्यपान करून आरडओरडा करीत होते. यात युवकांचा भरणा अधिक होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी सावंत यांनी या पर्यटकांची चौकशी केली व त्यांना सावंतवाडी येथे आणले.
हे सर्व पर्यटक कोल्हापूर येथील असून पोलिसांनी या सर्वांना समज देण्याचे काम सुरू होते. पण कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. दर रविवारी वर्षा पर्यटनाच्या निमित्ताने आंबोलीत मद्यपान करून येणाऱ्या पर्यटकांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असून अतिउत्साही पर्यटक तर पोलिसांच्या समोरच आरडाओरडा करीत पर्यटकांना त्रास देत असतात. असाच प्रकार आज घडला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी रविवारी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्याने जिल्ह्यातील तसेच सावंतवाडी व आंबोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत. (प्रतिनिधी)