पर्यटकांना खुणावतोय ‘भूलोकीचा स्वर्ग’
By Admin | Updated: July 21, 2014 23:09 IST2014-07-21T23:02:24+5:302014-07-21T23:09:41+5:30
महाबळेश्वरला गर्दी : कोसळणारे धबधबे पाहायला पावलं शोधतायत धुक्यातून वाट

पर्यटकांना खुणावतोय ‘भूलोकीचा स्वर्ग’
महाबळेश्वर : उंच डोंगरकड्यांवरून कोसळणारे धबधबे, डोळ्यांना सुखावणारे निसर्गसौंदर्य, कधी पावसाची रिमझिम अंगावर झेलत तर कधी धुक्याच्या दुलईतून पाऊलवाट तुडवत निसर्गाच्या कुशीत जाण्याचा मोह... सारं काही अवर्णनीयच. अशा या स्वर्गीय वातावरणाचा आनंद सध्या महाबळेश्वर व पाचगणीमध्ये पर्यटक लुटत आहेत. भरपावसात आनंद ओसंडून वाहत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या महाबळेश्वर, पाचगणीमध्ये सध्या भरपावसात चिंब भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. झिम्माड ओली पाऊलवाट तुडवत निसर्गप्रेमी, पर्यटक भटकंतीसाठी महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहेत. पावसामुळे महाबळेश्वरचे सृष्टिसौंदर्य बहरून आले आहे. परिसरातील लिंगमळा आणि अंबेनळी घाटातील धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळू लागल्याने लक्ष वेधून घेत आहेत. कोसळणाऱ्या धबधब्यांचा जलप्रपात अनुभवण्यासाठी आणि तुषार अंगावर झेलण्यासाठी अधीर झालेले पर्यटकांची पावले आपोआपच तिकडे वळू लागली आहेत.
गेल्या महिन्यात वेण्णालेकमध्ये पाण्याची पातळी कमी झाल्याने नौकाविहार करता येत नव्हते, त्यामुळे पर्यटकांना निराश होऊन आल्या पावली परतावे लागत होते. मात्र, आता पुन्हा वेण्णालेक भरून वाहू लागल्याने येथे नौकाविहार करण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडत आहे.
शनिवार-रविवार सुटी असल्यामुळे निसर्गप्रेमी आणि पर्यटकांनी नौकाविहाराचा मनमुराद आनंद लुटला. सध्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. सुटीच्या दिवशी महाबळेश्वर, पाचगणीत पर्यटकांचा जणू मेळाच भरत आहे. भरपावसात चिंब भिजण्याचा आनंद लुटताना पर्यटक दिसत
आहेत. (प्रतिनिधी)
भरपावसात भिजण्याचा आनंद लुटत असतानाच महाबळेश्वरची खासियत असणारी मसालेदार गरमागरम मक्याची कणसांचा स्वाद चाखण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. अंगभर पाऊस मुरल्यावर थंडीने अंग कुडकुडत असताना गरम मक्याची कणसे खाण्याची अन् मजा काही औरच असते. तसेच भुरभूर पावसात भिजत वाफाळलेल्या चहाचे घोट रिचविण्याची मजाही पर्यटक लुटत आहेत. चणे, फुटाणे, गाजर, लाल मुळा हे पदार्थही पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
घोड्यांवरून रपेट
पावसाचा जोर कमी झाला की वेण्णालेक परिसर, मुख्य बाजारपेठ याठिकाणी घोड्यांवरून रपेट मारण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. घोड्यावर बसून फिरण्याचा थरार अनुभवताना दिसत आहेत.
पॉर्इंटकडे प्रवेश बंद
सध्या महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्यात पाऊलवाटा निसरड्या बनल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते, त्यामुळे येथील पॉइंट बंद करण्यात आले आहेत. परिणामी पर्यटक वेण्णालेकमध्ये नौकाविहार करण्यासाठी गर्दी करत आहेत. येथील बाजारपेठही विविध वस्तूंनी फुलून गेली आहे. पर्यटक सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करताना दिसत आहेत.