पर्यटन चालना, घनसाळ संवर्धन चर्चेपुरतेच

By Admin | Updated: November 9, 2014 23:37 IST2014-11-09T23:16:56+5:302014-11-09T23:37:50+5:30

अनेक प्रश्न अनुत्तरित : निधीचा अभाव; रोजगारनिर्मिती आवश्यक; वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज--आजरा तालुका

For tourism promotion, solid culture discussion | पर्यटन चालना, घनसाळ संवर्धन चर्चेपुरतेच

पर्यटन चालना, घनसाळ संवर्धन चर्चेपुरतेच

ज्योतिप्रसाद सावंत - आजरा --जिल्ह्याच्या पश्चिम भागात वसलेल्या आजरा तालुक्याचा निसर्ग पर्यटकवर्गास निश्चितच मोहिनी घालणारा आहे. विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेत हा तालुका तीन विधानसभा मतदारसंघांत विभागला गेला आहे. सुकृतदर्शनी तालुक्याच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे; परंतु तालुक्यात येणारा निधी हा अपुरा असल्याने अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत.
आजरा साखर कारखाना व त्यानंतर अलीकडेच सुरू झालेली सूतगिरणी ही रोजगार निर्मितीची केंद्रे असली, तरीही सहकारी संस्थांनी बऱ्यापैकी कुटुंबांना आधार देण्याचे काम केले आहे. सुशिक्षित बेरोजगार वर्ग काजू प्रक्रिया व पोल्ट्री व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबी बनत आहे; परंतु ग्रामीण भागातील युवक आजही रोजगारासाठी पुणे-मुंबई यासारख्या महानगरांकडे आकर्षित होत आहे. त्यासाठी तालुक्यात मोठा रोजगार निर्मिती उद्योग सुरू होणे आवश्यक आहे.
तालुक्यातील उचंगी व सर्फनाला प्रकल्पांचे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लावण्याची गरज प्रकर्षाने पुढे येत आहे. उचंगी प्रकल्प मार्गी लागल्यास पूर्व भागातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात निघणार आहे. आजरा बसस्थानकाच्या नूतनीकरणाची केवळ चर्चाच आहे. निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मात्र कारवाई शून्य आहे.
शेतकरी मंडळाकडून घनसाळ भाताच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहेत; मात्र त्यावर अनेक मर्यादा येताना दिसतात. ऊस पीक वाढीसाठीही खास प्रयत्न होताना दिसत नाहीत, तर काजू बियांची बोंडे मातीमोल भावाने विकली जात आहेत.
तालुक्यातील क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी बरेच कष्ट घेतले; मात्र स्थानिक नेतेमंडळींना याचे गांभीर्यच नसल्याने क्रीडा संकुलाचे पुढे काय झाले? हा प्रश्न आजही कायम आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणारे एकमेव महाविद्यालय आजरा तालुक्यात आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषिपूरक, शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कोल्हापूर, सांगली यासारख्या शहरांशिवाय पर्याय राहिलेला नाही. स्थानिक शिक्षणाच्या सोयीसाठी स्व. अण्णा-भाऊशिवाय कोणीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. तालुक्यातील रस्ते, व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पुलाची उभारणी, साळगाव बंधाऱ्याची उंची वाढविणे हे प्रश्न
‘जैसे-थे’ आहेत. जंगली प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीला शेतकरी वर्ग वैतागला आहे. अनेक शासकीय कार्यालये, आरोग्य सेवा पुरविणारी केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील जागा रिक्तच आहेत. बदललेल्या सरकारकडून तालुक्यातील प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आहे.

शैक्षणिक प्रश्न
आजरा तालुक्यात उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालयाची गरज.
तालुक्यातील कृषिउद्योग पार्श्वभूमी पाहता महाविद्यालयात कृषिआधारित अभ्यासक्रमांची आवश्यकता

आजरा शहर
महिलांसाठी स्वच्छतागृहे नाही
आजरा-आंबोली मार्गाचे रुंदीकरण आवश्यक
पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी काढणे आवश्यक
मटण, मच्छिमार्केटसह कत्तलखाना गावाबाहेर नेणे गरजेचे

रोजगार निर्मिती
महाराष्ट्र राज्य विकास महामंडळाच्या जागी विविध उद्योग उभारण्याची गरज
काजू प्रक्रिया उद्योगाबरोबरच काजू बोंड प्रक्रिया उद्योग प्राधान्याने सुरू करणे आवश्यक
जंगली फळांवर वनौषधी निर्मिती करणारे उद्योग उभे करणे गरजेचे

पर्यटनाचे प्रश्न
रामतीर्थ परिसर विकासासाठी निधी गरजेचा
तालुक्यातील रस्त्यांची दुरुस्ती आवश्यक
चित्री प्रकल्पस्थळी बगीचा उभारण्याची गरज
कृषी पर्यटन स्थळांची आवश्यकता.

Web Title: For tourism promotion, solid culture discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.