महासभेत तब्बल ४५ विषयांना मंजुरी
By Admin | Updated: July 29, 2014 00:02 IST2014-07-28T23:45:50+5:302014-07-29T00:02:48+5:30
रोजंदारी कामगारांना दिलासा : मोबाईल टॉवरच्या जागेबाबत फेरविचार

महासभेत तब्बल ४५ विषयांना मंजुरी
कोल्हापूर : न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे १५३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेत असतानाच २००० सालापूर्वी सेवेत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांना हाच न्याय लावत कायम करण्याचा निर्णय आज, सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. सभागृहाने ५१ विषयांपैकी तब्बल ४५ विषयांवर संमतीची मोहर उमटवली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सुनीता राऊत होत्या. सभेत येळ्ळूर येथील घटनेबाबत कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात आला. महाराणा प्रताप चौकातील अपूर्ण बस टर्मिनसची इमारत दुरुस्त करणे, केएमटीला नव्या बसेसाठी साडेचार कोटी रुपयांच्या कर्जासाठी मंजुरी, जैव वैद्यकीय कचऱ्याच्या निराकरणासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविणे, भाडेतत्त्वावर गाळा देताना अपंग व महिलांसाठी ३० टक्के राखीव, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासाठी भांडवली खर्चापैकी २५ टक्के रक्कम राखीव ठेवणे, आदी महत्त्वाच्या विषयांसह इतर मिळून तब्बल ४५ विषयांना सभेत मंजुरी देण्यात आली.मोबाईल टॉवरसाठी शहरातील महापालिकेच्या ४० खुल्या जागेत १०० मोबाईल टॉवर बसविण्याच्या प्रस्तावाची सविस्तर माहिती सभागृहास द्यावी, याबाबत सदस्यांचे मत व प्रश्नांचे निरसन करूनच पुढील सभेपुढे विषय ठेवण्याचे ठरले. एलबीटीऐवजी जकात सुरू करण्याच्या मागणीचा ठराव मागे घेण्यात आला. कळंबा कारागृहाभोवतालची ५०० मीटर जागा नो डेव्हलपमेंट झोन घोषित करण्याच्या शासनाच्या आदेशास विरोध असल्याचे शासनास कळवावे, याबाबत सुधारित फेर प्रस्ताव पाठविण्याची सूचना सभागृहाने प्रशासनास केली. चर्चेत सचिन चव्हाण, भूपाल शेटे, राजू लाटकर, आदिल फरास, निशिकांत मेथे, आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, मधुकर रामाणे, यशोदा मोहिते, आदी नगरसेवकांनी चर्चेत सहभाग घेतला.