एकाच बैठकीत तब्बल २८५ आरक्षणे उठविली
By Admin | Updated: October 19, 2015 00:43 IST2015-10-19T00:41:20+5:302015-10-19T00:43:39+5:30
‘ताराराणी’वर आरोप : राष्ट्रवादीचा जाहीरनामा

एकाच बैठकीत तब्बल २८५ आरक्षणे उठविली
कोल्हापूर : महापालिकेमध्ये ताराराणी आघाडी सन २००० ते २००५ या काळात सत्तेवर असताना एकाच बैठकीत तब्बल २८५ आरक्षणे उठविली. त्यांचा बाजार मांडला. तेच नेते बाशिंग बांधून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत, अशी बोचऱ्या टीकेची नोंद राष्ट्रवादी पक्षाने रविवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात आहे. याशिवाय गेल्या जाहीरनाम्यात असलेली ९० टक्के कामे पूर्ण केल्याचा दावाही केला आहे. पाच वर्षांत राज्य शासनाकडून आलेल्या निधीतून झालेली विविध विकासकामे सचित्र जाहीरनाम्यात आहेत. जाहीरनाम्याची आकर्षक आणि लक्षवेधी अशी आठ ग्लेझची पाने आहेत. त्यात म्हटले आहे, पाच वर्षांत एकूण १२३० कोटी रुपयांचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलला. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त करांचा बोजा लादला नाही. एकाही जागेचे आरक्षण उठविले नाही. दहा वर्षांपूर्वी कोल्हापूर महापालिकेत घोडेबाजाराला ऊत आला होता. घोड्यांची रेस आणि रेसकोर्स असे विदारक चित्र झाले होते. कोणताही विचार नाही, धोरण नाही. पंधरा-सोळा वर्षांत केवळ ५८ कोटींचा निधी आणला. मात्र राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि जनसुराज्य पक्षाचे नेते विनय कोरे यांनी पक्षीय राजकारण रुजविले. १२३० कोटींची विकासकामे झाली. दिवंगत अॅड. गोविंद पानसरे यांचे स्मारक उभारणे, फ्लायओव्हर पुलांची निर्मिती करणे, रंकाळा तलाव सुशोभित करणे, सीसीटीव्हीयुक्त शहर करणे, सोलर, इको शहर बनविणे, बहुमजली पार्किंग व्यवस्था निर्माण करणे,घनकचरा व्यवस्थापन करणे, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे, आदी कामे करणार असल्याचे जाहीरनाम्यात सांगितले आहे.
आघाडी कायम..
राष्ट्रवादी पक्षाने निवडणुकीत सर्वप्रथम प्रभागनिहाय उमेदवार जाहीर केले. त्यानंतर जाहीरनामा प्रसिद्धी करणे, प्रचाराचा नारळ फोडणे यामध्येही आघाडी कायम राखली.