खेडमध्ये तुफानी पाऊस--रोहा तालुक्यात पूल वाहून गेला

By Admin | Updated: September 23, 2016 00:34 IST2016-09-23T00:23:23+5:302016-09-23T00:34:37+5:30

नद्यांना पूर : एकजण बेपत्ता; महामार्ग बंद;

Tornado rain in the village - the bridge was flown in Roha taluka | खेडमध्ये तुफानी पाऊस--रोहा तालुक्यात पूल वाहून गेला

खेडमध्ये तुफानी पाऊस--रोहा तालुक्यात पूल वाहून गेला

खेड/रायगड : जोरदार पावसामुळे रोहा रामराजमार्गे अलिबाग या मार्गावरील झोळंबे कोपरा येथील छोटा पूल गुरुवारी सकाळी वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान, खेड तालुक्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून खेडमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. खेड-दापोली मार्ग बंद झाला असून, नारिंगी आणि चोरद नदीला पूर आला आहे. यामुळे ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचे पाणी भरणे नाका येथील जगबुडी पुलावरून वाहू लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली.
तालुक्यात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नारिंगी नदीला पूर आल्यामुळे खेड-दापोली मार्ग बंद झाला आहे, तर चोरद नदीला आलेल्या पुरामुळे ४२ गावांचा संपर्क तुटला आहे. पोलिस व प्रशासनाचे कर्मचारी किनाऱ्यावरील गावांकडे लक्ष ठेवून आहेत. बीजघर येथील एकजण नदीत वाहून गेला आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
महाड येथील सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस व प्रशासनाने मुंबई-गोवा महामार्ग अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खेड पोलिसांनी चिपळूच्या दिशेने जाणाऱ्या सर्व एस. टी. बसेस व इतर वाहने भरणे नाका येथे अडविल्या, तर चिपळूण पोलिसांनी चिपळूण येथे सर्व वाहने थांबवून ठेवली आहेत.
पावसामुळे रोहा तालुक्यातील झोळंबे कोपरा येथील अंदाजे १२ फूट लांबीचा पूल गुरुवारी सकाळी वाहून गेला. सोनगाव येथील जेटीवरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे हा पूल कमकुवत झाला होता, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. या पाण्याने छोट्या पूलाला धडक दिल्याने तो वाहून गेला.


चिपळूणमध्ये जनजीवन विस्कळीत
चिपळूणमध्ये गेले चार ते पाच दिवस पावसाने हजेरी लावली असून, गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. -/ वृत्त हॅलो १

Web Title: Tornado rain in the village - the bridge was flown in Roha taluka