क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक
By Admin | Updated: August 9, 2016 01:13 IST2016-08-09T00:43:23+5:302016-08-09T01:13:11+5:30
हुतात्म्यांना अभिवादन : हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे कार्यक्रम

क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला मशाल मिरवणूक
कोल्हापूर : भारत माता की जय...आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो...वंदे मातरम्....इन्कलाब झिंदाबाद, अशा घोषणांनी सोमवारी सायंकाळी मिरजकर तिकटी येथील सुभाषचंद्र बोस चौक दुमदुमला. निमित्त होतं...आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आयोजित ‘क्रांतिज्योत मिरवणुकीचं’. या मिरवणुकीने हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.
सायंकाळी साडेपाच वाजता महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, नगरसेविका सुनंदा मोहिते, नगरसेवक सुनील पाटील, नियाज खान, माजी महापौर महादेवराव आडगुळे, अध्यक्ष मधुकर रामाणे, उपाध्यक्ष दुर्वास कदम, रामेश्वर पतकी, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, मुसाभाई शेख, अशोक पोवार, बाबा पार्टे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मंगळवार पेठ, मिरजकर तिकटी येथील सुभाषचंद्र बोस चौक येथून ही मिरवणूक निघाली. महापौर रामाणे यांच्यासह मान्यवर यामध्ये सहभागी झाले. भारत माता की जय...आॅगस्ट क्रांतिदिन चिरायू होवो...वंदे मातरम....इन्कलाब झिंदाबाद, अशा घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमला. बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, दैवज्ञ बोर्डिंगमार्गे मिरजकर तिकटी येथे येऊन हुतात्मा क्रांती स्तंभासमोर राष्ट्रगीताने मिरवणुकीची सांगता झाली. आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती स्तंभाला नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या मिरवणुकीमध्ये ज्येष्ठ नेते रामभाऊ चव्हाण, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक आदिल फरास, राजू लाटकर, अजित सासने, बाबूराव चव्हाण, आदींसह शंभरहून अधिक लोक सहभागी झाले होते.
आॅगस्ट क्रांतिदिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे सोमवारी मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी येथील हुतात्मा क्रांती स्तंभाला नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली.